जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हाभरात शेतकर्यांना कृषी पंपासाठी ट्रान्स्फॉर्मर मिळवण्यासाठी महावितरणकडून अडचणी येत आहेत. दुरुस्ती आणि ऑइलसाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधी देणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना दिली. याबाबत तातडीने जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन शेतकर्यांना तातडीने ट्रान्स्फॉर्मर देणार असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेची जिल्हा बैठक अजिंठा विश्रामगृहात झाली. या वेळी पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांकडून मांडलेल्या अडचणींवर पालकमंत्री बोलत होते. आमदार किशोरअप्पा पाटील यांनी शेतकर्यांना वेळेत ट्रान्स्फॉर्मर मिळत नसल्याने पिके धोक्यात आल्याचे सांगितले.
या वेळी आमदार चिमणराव आबा पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन,जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, गोपाळ चौधरी, पद्मसिंग पाटील, धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे,युवासेना प्रमुख शिवराय पाटील यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी केले. आमदार चिमणराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी किमान ४० जागा आपण जिंकू शकतो,असा विश्वास व्यक्त केला. जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रास्ताविक केले.