जळगाव ः विशेष प्रतिनिधी
आपल्या देशात,राज्यात,जिल्ह्यात,गावात किंवा शहरात प्रशासन किंवा पोलिसांकडून करण्यात येणारी कोणत्याही स्वरूपातील कारवाई हंगामीच म्हटली पाहिजे कारण एकतर तक्रारी होतात त्यावेळी किंवा कोणतीही दुर्घटना झाली की कारवाईचा बडगा उगारला जातो.
संबंधितांवर कारवाईचा फार्स केला जातो, प्रसंगी दंडात्मक कारवाई होते.उदाहरण द्यायचे झाले तर चेन्नई येथील फटाक्यांच्या कारखान्याचे देता येईल(राष्ट्रीय)तेथे फटाक्यांच्याय कारखान्यात स्फोट झाला.काही बालकांसह कित्येक कामगार मृत्युमुखी पडले.पोलीस आणि प्रशासनाने लगेच धाव घेतली असता त्या कारखान्यात अग्नी विरोधक व अन्य सुरक्षिततेच्या सुविधा आढळून आल्या नव्हत्या.त्याविरुद्ध गंभीर कारवाई केली गेली.
जळगाव शहराच्या राजकमल टॉकीज चौकात पाच वर्षांपूर्वी नंदकुमार नामक अग्रवाल यांच्या होलसेल फटाका विक्रीच्या दुकानात भरदिवसा आग लागली होती.त्याची झळ परिसरातील दुकानांना बसली होती.संपूर्ण दुकान व दुकानातील माल जळून खाक झाला होता. त्या आगीचे स्वरूप इतके भयंकर होते की,आग आटोक्यात आली नसती तर त्याच परिसरात असलेली फटाक्यांचीच अन्य दुकाने आगीच्या लपेटात येऊन संपूर्ण परिसरच खाक झाला असता. त्या दुर्घटनेनंतर पोलीस व जिल्हा प्रशासन जागे झाले,यांनी तेथील सुरक्षतेच्या बाबी तपासल्या असता खूप त्रुटी आढळल्या.परिणामी ते दुकान सील करण्यात आले होते.बरेच दिवस ते बंदावस्थेत होते.नंतर होते तसेच पूर्ववत सुरू झाले आहे.
परवाच्या किनगाव जवळील पपईने भरलेल्या आयशर ट्रक दुर्घटनेत बालक व महिलांसह १५ मजूर ठार झाले होते.पपईने भरलेला ट्रक पलटी झाला व त्या भीषण दुर्घटनेत भरलेल्या पपई खाली दाबुन हे सर्वजण मरण पावले होते .आता त्या दुर्घटनेबद्दल अवैध प्रवासी वाहतूक व ओव्हरलोड हे मुद्दे उपस्थित झाले आहेत .त्यादृष्टीने संबंधितांवर पोलीस किंवा आरटीओ कारवाई करतील.
जळगाव शहरानजीकच्या नशिराबाद रस्ता, पाळधी -एरंडोल रस्ता ,शिरसोली रस्ता, व ममुराबाद रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतुकीचे शेकडोवर बळी गेले आहेत.तीन आसनी रिक्षा दुर्घटनेत ७ मृत्यू,सात आसनी जीप दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू,पाच आसनी रिक्षा दुर्घटना ९ जणांचा मृत्यू.अशा या दुर्घटना. विशेष म्हणजे तीन आसनी रिक्षेत ७ मृत्यू जातात,सातची क्षमता असणार्या वाहन दुर्घटनेत १२ बळी पडत जातात,म्हणजे हा अवैध प्रवासी वाहतूकचा प्रकार ठरतो.पोलीस प्रशासन व आरटीओचे याकडे अर्थपूर्ण तसेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष असते. आणि अशाप्रकारच्या कोणत्याही दुर्घटना घडल्यावर ती फटाक्यांच्या कारखान्यातील असो,जळगावच्या फटाका दुकानातील,किनगावची असो किंवा कोणतीही अपघाताची.आपले पोलीस प्रशासन कारवाईची मोहीम सुरू करते.अवैध प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षा,जीपगाड्या,टॅ्रव्हल्स गाड्या जप्त करून कडक कारवाई होते.वाहनधारक त्या मोहिमेपुरता व्यवसाय बंद ठेवतात आणि कारवाईचा फार्स संपला म्हणजे सारे काही पूर्ववत सुरू राहते.
जळगाव शहरातच तीन आसनी रिक्षात आठ ते नऊ जण कोंबून भरले जातात.शनी मंदिराकडून ममुराबाद,विदगावकडे जाणार्या कालिपिली व रिक्षेत ८ ते १० जण भरतात, शिरसोली जाणारांसाठी इच्छादेवी मंदिराजवळून रिक्षा -कालिपिली जातात. जवळच पोलीस चौकी आहे,पण नियम धाब्यावर.भुसावळ जाण्यासाठी अजिंठा चौकातून गाड्या जातात,त्यातही प्रवासी कोंबून भरले जातात.त्याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसते.दुर्घटना घडून गेली ,लोक मरण पावले की कारवाईचा बडगा.हा नित्याचाच प्रकार झालाय.
आता कदाचित मार्च एंडिंगच्या नावाने कारवाईची मोहीम राबविली जाईल याची वाहनधारकांनाही जाणीव असते.पण कोणत्याही अवैध गोष्टीवर प्रतिबंध घालायचा तर तात्पुरती कारवाई ,मोहीम नको तर त्यात सातत्य हवे.तेव्हाच अवैध प्रवासी वाहतुकीचे बळी थांबतील.जळगावातील फटाके होलसेल विक्रीची दुकाने पहा, आजही भर वस्तीत थाटली आहेत.तेथे सुरक्षेचे ,अग्नी विरोधक उपाययोजना अस्तित्वात आहेत काय?.जाणून घेणे महत्वाचे आहे.