जळगाव : प्रतिनिधी
दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचे संलग्नित १५०० चे वर बचत गट आहेत. बचतगटाच्या माध्यमातून बँकेशी १५,००० चे वर महिला संलग्नीत झालेल्या आहेत. या माध्यमातून बँक फायनान्शियल इन्क्लुजनचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. बचत गट हे फायनान्शइल इन्क्लुजन साठी महत्वाचे माध्यम आहे. बहुतेक बचत गट हे उद्यमशिल असून बचत गटातील अनेक महिला उद्योजिका आहेत. परंतु त्यांच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होत नसते. त्यातही कोरोनाच्या काळात महिलांना रोजगार मिळणे कठीण झाले होते, तेव्हाही बँकेने विविध प्रकारे रोजगार मिळवून देण्यास मदतीचा हात पुढे केला. महिला स्वावलंबनाचे तसेच सक्षमीकरणाचे कार्यक्रम बँक विविध माध्यमातून राबवत असते. जेणेकरुन त्यातील महिलांना रोजगारसंधी उपलब्ध होईल तसेच महिलांना व्यवसायाभिमुख होण्यास प्रोत्साहन मिळेल.
त्या अनुषंगाने जळगाव पीपल्स बँक आयोजित व नाबार्ड प्रायोजित महिला बचत गटांच्या उत्पादनांचा उद्योगिनी मेळावा २०२१चे आयोजन १८ ते २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत यशोदया हॉल, रिंग रोड, जळगाव येथे करण्यात आले आहे.सदर मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारीे अभिजीत राऊत, महापौर भारतीताई सोनवणे व उपमहापौर सुनिल खडके यांच्या हस्ते व नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्रीकांत झांबरे, माजी सभापती ऍड. शुचिता हाडा, बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, बँकेच्या बचतगट प्रमुख शुभश्री दप्तरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे रत्नागिरीचे स्टॉल्स विविध उत्पादनांसह उपलब्ध आहेत. त्यात हापुस आंब्याची प्री-बुकींग करण्यात येणार आहे, जेणेकरुन जळगावकरांना कोणतीही प्रक्रिया न झालेला झाडावरचा आंबा चाखायला मिळणार आहे. रेडीमेड ब्लाऊज, साडी-ड्रेस मटेरीयल, सोलापुरी चादरी, बेडशिटस्-पिलो कव्हर्स, पायपुसणी व गोधडी, गिफ्ट आर्टीकल्स, बॅग्स-पर्सेस, फणसाचे चीप्स, विविध कोकणी पदार्थ, देवाचे वस्त्र, बाळंतविडा, फुड कोर्ट, खान्देशी पदार्थांची मेजवानी, सर्व प्रकारचे पापड व मसाले अशी अनेक उत्पादने मेळाव्यात विक्रीस उपलब्ध आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, पारोळा, भडगाव, रणाइचे, डांभुर्णी अशा विविध ठिकाणाहून महिला बचत गट मेळाव्यात सहभागी झाले आहेत. तरी सर्व जळगावकरांनी मेळाव्यास अवश्य भेट द्यावी असे आवाहन बँकेतर्फे व नाबार्डतर्फे करण्यात आले आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातील. सदर कार्यक्रमामध्ये सर्वांनी मास्क घालणे, सोशल डिस्टंसींग ठेवणे, हात सॅनिटाइज करणे इ. कोरोना प्रतिबंधक काळजी घेतली जाईल. स्टॉलधारकांना तसेच ग्राहकांना सदर नियम पाळणे बंधनकारक राहील.
