भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक ७ मार्च रोजी लेडीज इक्वलिटी रनचे आयोजन केले आहे.
ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी सुरु असून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . महिलांना धावणे व आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या रनचा उद्देश आहे . त्यानिमित्ताने अकोला येथील सुप्रसिद्ध महिला धावपटू डॉ. अपर्णा पाटील या लेडीज रनसाठी सदिच्छादूत असतील. त्या अकोला येथील प्रसिद्ध श्रीरोगतज्ञ डॉक्टर आहेत . शिवाय नामांकित अशा अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्टस अँन्ड मेडिसीन या संस्थेतून प्रमाणित मॅराथॉन ट्रेनर म्हणून त्यांना मान्यता आहे .त्यांचे वैद्यकीय शिक्षण बीजे मेडिकल कॉलेज पुणे व पदव्युत्तर शिक्षण जे जे हॉस्पिटल मुंबई येथे झाले आहे.डॉक्टर कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या डॉ. अपर्णा यांचे पती डॉ. रणजीत पाटील हे अकोला येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ आहेत. शिवाय ते मागील बीजेपी शासनात गृहराज्यमंत्री होते. त्यांची मुलगी करिष्मा ही देखील डॉक्टर असून मुलगा तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. डॉ. अपर्णा यांनी प्रसिद्ध अशा टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये ४२ किलोमीटर गटात यशस्वी सहभाग नोंदविला आहे.शिवाय त्यांनी २१ किलोमीटरच्या तब्बल १४ हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला आहे .शिवाय १० किलोमीटरच्या १८ स्पर्धांचा देखील यात समावेश आहे. राज्य पातळीवर झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पाच स्पर्धांमध्ये त्या पारितोषिक विजेत्या आहेत .शिवाय त्या बुद्धिबळ व टेबल टेनिसच्या देखील उत्कृष्ट खेळाडू आहेत .नजीकच्या भविष्यात त्या जगप्रसिद्ध बर्लिन मँरेथॉन व लंडन मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. याशिवाय पोलीस सन्मान रन व यासारख्याअसंख्य स्पर्धासाठी त्यांनी सदिच्छा दूत म्हणून काम केलेले आहे . भुसावळ शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. नीलिमा नेहेते यांच्या त्या वर्गमैत्रीण असल्यामुळे अशी प्रसिद्ध व महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्ती या महिला रनसाठी सदिच्छादूत म्हणून मिळाल्याचा आनंद संयोजिका डॉ. चारुलता पाटील यांनी व्यक्त केला आहे.