जळगाव : प्रतिनिधी
शहरातील वाटीका आश्रमाजवळील राष्ट्रीय महामार्गावर एका ५० वर्षीय पादचार्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अज्ञात वाहनधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील कांचननगर परिसरातील भरत रामचंद्र सोनवणे (वय ५०) हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काल रात्री वाटीका आश्रम परिसरात राहणारे त्यांचे मित्र मगन काळे यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. सदर कार्यक्रम आटोपून भरत सोनवणे हे कांचननगरकडे जाण्यासाठी १० वाजेच्या सुमारास पायी निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरुन जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी कल्पना, दोन मुले ललित व घनश्याम व एक विवाहीत मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपास पोहेकॉ गुलाब पाटील हे करीत आहेत.