नन्नवरेंसह गावगुंडांवर गुन्हा दाखल करुन त्यांना संरक्षण देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणी

0
11

जळगाव ः प्रतिनिधी
अनूसुचित जातीसाठी राखीव असलेल्या बांभोरी येथील सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या सचिन यशवंत बिर्‍हाडे यांना पोलीसासमक्ष बेदम मारहाण करुन अपहरण करणार्‍या भिकन नन्नवरे व त्यांच्या गावगुंडावर तातडीने गुन्हा नोंदवून या प्रकारची पूर्वकल्पना व तक्रार करुनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बांभोरी प्र.चा. धरणगाव येथील सरपंचपद अनूसुचित जाती संवर्गासाठी राखीव झाले आहे. बांभोरी येथील ग्रामपंचायत निवडणूकीत अनूसुचित जातीच्या जागेतून सचिन यशवंत बिर्‍हाडे हे एकमेव उमेदवार विजयी झाल्याने ते सरपंचपदी विराजमान होतील हे निश्चित झाले होते. मात्र एक दलीत व्यक्ती सरपंच म्हणून आपल्यावर राज्य करतील अशी जातीय भावना बाळगणार्‍या ग्रा.पं. सदस्य भिकन नन्नवरे व त्यांचे गावगुंड साथीदारांमार्फत सचिन बिर्‍हाडे यांनी सरपंचपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करु नये यासाठी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धमकावत दहशत टाकण्याचा सतत प्रयत्न केला आहे.
विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल घोषीत झाल्यावर याचदिवशी बांभोरी गावातील २५ ते ३० गावगुंडांनी सचिन बिर्‍हाडे यांच्या घरावर हल्ला करुन घरातील सामानांची तोडफोड करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिलेली होती. या संदर्भात दि. २० जानेवारी २०२१ रोजी पोलीसांकडे तक्रार झालेली असतांनाही कोणतीही चौकशी व कारवाई करण्यात आलेली नव्हती.
अशी परिस्थिती असतांना सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम प्रशासनाकडून घोषित झाल्यानंतर दलीत समाजाचा व्यक्ती सरपंच होवू नये म्हणून भिकन नन्नवरे व त्यांचे गावगुंड साथीदार हे सचिन बिर्‍हाडे व त्यांच्या कुटुंबियांना धमकावून जिवे ठार मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार सचिन बिर्‍हाडे यांनी १२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली होती.
या संदर्भात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी चोपडा डी.वाय.एस.पी. श्री.रायसिंगे, धरणगाव पोलीस स्टेशनचे पी.आय. श्री.हिरे व पाळधी पोलीस दुरपरिक्षेत्राचे एपीआय बुवा यांच्याकडे सचिन बिर्‍हाडे या दलीत उमेदवाराला संरक्षण पुरविण्याबाबत मागणी केली होती. मात्र धरणगाव पो.स्टे.चे पीआय श्री.हिरे व पाळधी औटपोस्टचे एपीआय श्री. बुवा यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता भिकन नन्नवरे व त्यांच्या गावगुंड सहकार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या सचिन बिर्‍हाडे यांना पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे उपस्थितीत भिकन नन्नवरे व सहकार्‍यांनी त्यास बेदम मारहाण करुन त्यास जबरदस्तीने उचलून नेले जात असतांनाही पोलीस अधिकार्‍यांनी बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणात पोलीसांची भूमिका संशयास्पद आहे.त्यामुळे भिकन नन्नवरे व त्याच्या गावगुंड सहकार्‍यांवर अनूसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अपहरण करण्याचा गुन्हा तसेच निवडूक प्रक्रियेत अडथळे आणल्याप्रकरणी शासकीय कार्यात अडथळे आणण्याचा विनाविलंब गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच या बाबत घटनेची पूर्वकल्पना असूनही भिकन नन्नवरे व त्यांच्या गावगुंडाविरुध्द कोणतीही कारवाई न करता दलीत उमेदवारांची डोळ्यासमक्ष मारहाण करुन अपहरण होत असतांना बघ्याची भूमिका घेणारे धरणगावचे पो.नि. श्री.हिरे व पाळधी औटपोस्टचे सपोनि श्री.बुवा यांना तातडीने निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here