आयुक्त साहेब,अनधिकृत धार्मिक स्थळे पाहिलीत आता रस्त्यांची अवस्था नी अस्वच्छताही पहा

0
16

जळगाव ः विशेष प्रतिनिधी
महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे जागेवर जाऊन पहिली.त्यामुळे होणारी अडचण आणि अडथळे त्यांच्या लक्षात आले, आणि लागलीच तशी वादग्रस्त अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झाला.त्याचप्रमाणे आयुक्त साहेबांनी आता संपूर्ण शहरात फेरफटका मारावा आणि रस्त्यांची अवस्था तसेच शहरातील अस्वच्छता पहावी व त्याबद्दलही निर्णय घ्यावा अशी मागणी शहरातील सहनशील लोकांनी केली आहे.
जळगावकर नागरिक खरोखरच अत्यंत सहनशील आहेत.परिसरात कितीही घाण असो,कचरा कुंड्या फुल्ल झालेल्या असोत,गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून गटाराचे पाणी वहात असो,दोन दिवसांच्या अंतराने मिळणारे पाणी लाईन फुटली किंवा गळती झाली तर चार दिवसांनंतर मिळो,स्ट्रीट लाईट बंद असो,घरापर्यंत जाण्याचा रस्ता खडतर का असेना सारेकाही सहन करून महापालिकेच्या करांचा भरणा (काही लोक वगळून)वेळेवर करतात त्यांनाच जळगावचे नागरिक म्हणावे.त्यांचे कौतुक करावे ते थोडेच.
सद्यस्थितीत शहरातील सर्वच रस्त्यांची पार वाट लागलेली आहे.सुमारे तीन वर्षांपासून शहराच्या उपनगरातून सुरू झालेले अमृत पाणी योजनेचे काम शहरात आले.त्यासाठी रस्ते खोदून ठेवले.नंतर मलनिस्सारण योजनेसाठी रस्ते मधोमध खोदले.आणखी भरीस भर म्हणून की काय,खोदलेले रस्ते आणखी भुयारी गटारांसाठी खोदले.खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याची चांगली पद्धत जळगाव महापालिकेला ठाऊक नाही .त्यामुळे तीन वर्षा पूर्वी कॉलन्यात खोदून ठेवलेले छोटे-मोठे रस्ते तसेच खाच-खळग्यांचे आहेत.नागरिक सहन करीत आहेत.
आणि आता शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची तशीच अवस्था आहे.सर्वत्र खोदकाम झाल्याने धुळीचे साम्राज्य आहे.खाच-खळगे व खड्ड्यांमुळे लोकांना मान व कमरेचे दुखणे सुरू झाले आहे.कुठेच डागडुजी नाही आणि जी केली जाते आहे त्याचा कोणताच दर्जा तपासला जात दिसते. नसल्याचे जड खडी आणि त्यावर थोडाफार डांबर शिडकावा केला जातो आहे.त्यावर किती खर्च होणार माहीत नाही.
शहरातील पुष्पलता बेंडाळे चौक ते अप्पा महाराज समाधी मंदिर मार्गे एकदा आयुक्त साहेब आपण आणि उपायुक्त बाहुळे साहेब तसेच महापौर भारती सोनवणे,नगरसेवक कैलास सोनवणे आदींनी पायी किंवा मोटारसायकल वर फेरफटका मारावा अशी या सहनशील नागरिकांची मागणी आहे.दिवसभर इतकी धुळ उडते की,एखाद्या खेडेगावात गाड रस्त्यावर सुद्धा इतकी धुळ नसावी.आपल्या आधी जर मोठे वाहन चालत असेल तर पुढचा मार्गच दिसत नाही इतकी धुळ. तरीही जळगावकर गप्पच.कौतुकास पात्र आहेत सारे.
मागे शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी २४ लाखांचा मक्ता दिला होता.त्यावेळी खड्ड्यांमध्ये दगड,माती,मुरूम.वेस्ट मटेरियल टाकण्यात आले होते.ते किती टिकले व २४ लाख का खर्च केले कुणास ठाऊक.आताही थोडेफार वेगळ्या प्रकारात सुरू आहे .खडी आणि थोडेफार डांबर मिक्स केले जाते आहे.ते किती टिकेल हा प्रश्न आहे.
आमदार भोळे यांनी अलीकडेच रस्त्यांच्या कामासाठी आणखी दोन महिने प्रतीक्षा करायला सांगितले आहे.त्यातही कामे ७० कोटींची होणार असून ४२ कोटींचा निधी मिळणे बाकी आहे.त्यासाठी त्यांनी(भोळे) पालकमंत्र्यांना मदत करायची विनंती केली आहे. दोन महिने म्हणजे एप्रिल उजडणार ,तोवर ते ४२ कोटी मिळाले पाहिजेत.न मिळाले किंवा उशीर झाला तर पावसाळा तोंडावर असतो आणि पावसाळ्यात डांबरीकरण होत नाही.म्हणजे जळगावकरांच्या माथी आणखी धुळ खड्डे राहतीलच.तेव्हा आयुक्त साहेब,आपण कृपया शहरातील रस्त्यांवर फेरफटका मारावा व जळगावकरांच्या हाल अपेष्टा याची डोळा अनुभवाव्यात ही सहनशील लोकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here