मुंबई लोकलबाबत आज मंत्रिमंडळात चर्चा…

0
11

मुंबईः करोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळं सर्वसामान्यांसाठी तब्बल १० महिने बंद असलेली मुंबई लोकलसेवा फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा सुरु झाली. मात्र, सर्वसामान्यांसाठी वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळं सर्वसामान्य मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांच्या या नाराजीनंतर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकलच्या वेळेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील करोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल खुली करण्याचा निर्णय घेतला मात्र, सर्वसामान्यांसाठी वेळेच बंधन घालण्यात आलं आहे. त्यानुसार, पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ४ व रात्री ९ वाजल्यानंतर या वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे सुमारे ४७ लाख प्रवासी अद्याप लोकल प्रवासासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वसामान्यांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुद्दा उपस्थित करणार असून यावर चर्चाही होणार असल्याची शक्यता आहे.

‘लोकानां सोयीच्या वेळेत लोकल उपलब्ध व्हावी यासाठी आमच्या विभागानं हा विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. मंत्रिमंडळाची बैठक आहे तिथंही आम्ही बोलू. त्या संदर्भात जनतेसाठी योग्य तो निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार घेण्याचा आम्ही प्रयत्न करु,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here