जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव- औरंगाबाद महामार्गावरील रायपूर व कुसुंबाजवळील काढण्यात आलेल्या डीपीविषयी वृत्त ‘साईमत’ वृत्तपत्रात प्रकाशित होताच महावितरण कंपनीतर्फे डीपी बसविण्यात आली. यामुळे रायपूर येथे विजेच्या सप्लायअभावी बंद असलेला पाणीपुरवठा पुर्ववत सुरू झाला आहे. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून याबाबत रायपूर ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले.
रायपूर गावाला लागूनच असलेल्या कुसुंबा गावाजवळच काही अंतरावर रायपूर येथे पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहिर आहे. तालुक्यातील रायपूर-कुसुंबा गावाला वीज पुरवठा करण्यासाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गाला लागूनच डीपी बसविण्यात आली होती. परंतु महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे व अडथळा ठरत असल्यामुळे ही डीपी काढण्यात आली होती. पुरेसा विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे रायपूर येथे गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाणीपुरवठा बंद झाला होता. यामुळे महिलांसह ग्रामस्थांतर्फे रायपूर ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. याबाबत ‘दै.साईमत’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनानेे ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत वीजवितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वीज वितरण कंपनीने याची दखल घेत काढण्यात आलेली डीपी बसविण्यात आली. यामुळे खंडीत झालेला वीज पुरवठा पुर्ववत सुरू होऊन रायपूर गावात पाणीपुरवठा सुरळीत झाला. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला व ग्रा.पं.प्रशासनाचे व वीज वितरण कंपनीचे आभार मानले.