जळगाव ः प्रतिनिधी
येथील मेहरुण परिसरातील राम नगरमधील रहिवासी पत्रकार संतोष पितांबर ढिवरे यांचे सोमवार दि.८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज दि. ९ रोजी सकाळी ९.३० वाजता मेहरुण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
येथील पत्रकार संतोष ढिवरे यांची प्रकृती काही दिवसापूर्वी खालावली होती. त्यांच्या प्रकृतीत जळगाव येथे उपचारात कुठलीही प्रगती होत नसल्याने त्यांना मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले होते. दि.८ रोजी दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
संतोष ढिवरे हे सायंदैनिक ‘साईमत’सह ‘साईमत लाईव्ह’चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहत होते. ते सुमारे १० ते १५ वर्षापासून पत्रकारीतेत कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वृत्तवाहिनी विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. ढिवरे यांचा अत्यंत मनमिळावू स्वभाव असल्याने शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये ते नावलौकिक मिळवून होते. त्यांच्या अकाली जाण्याने जिल्ह्यात पत्रकार बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे. अंत्यसंस्काराच्यावेळी पत्रकारीता क्षेत्रासह समाजातील सर्व स्तरातील प्रतिष्ठीत नागरीकांचा समावेश होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे. ते ईश्वर ढिवरे यांचे भाऊ होत.