संगणकीकृत ७/१२ मधील चुका दुरुस्तीसाठी विशेष शिबिराचे आजपासून आयोजन

0
45

जळगाव ः प्रतिनिधी

जिल्ह्यात महाराजस्व अभियान-२०२० राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत संगणकीकृत ७/१२ अद्यावतीकरणाचे कामकाज हाती घेण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने पाचोरा उपविभागात कामकाज सुरु आहे.

जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्रानुसार ज्या संगणकीकृत ७/१२ उतार्‍यामध्ये टंकलिखित चुका झालेल्या आहेत.त्या चुका दुरुस्तीसाठी पाचोरा व भडगाव तालुकास्तरावर ८ ते १५ फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत मंडळनिहाय विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या विशेष शिबिरामध्ये ७/१२ दुरुस्तीसाठी नविन अर्ज स्वीकारणे, जुन्या हस्तलिखीत अभिलेखावरुन खात्री करणे, तलाठी यांनी कलम १५५ चे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे, तहसिलदार यांनी ऑनलाईन प्रस्तावांना खात्री करुन मान्यता देणे, परिशिष्ट-क मधील आदेश तहसिलदार यांनी स्वाक्षरी करणे आणि मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार यांचे स्वाक्षरी आदेश पाहून फेरफार नोंदी प्रमाणित करणे आदि कामे करण्यात येणार आहे.

तरी पाचोरा व भडगाव तालुक्यातील ७/१२ उतारा धारक खातेदारांना महसूल प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की, ज्या खातेदांराच्या संगणकीकृत ७/१२ उतार्‍यामध्ये टंकलेखनाच्या म्हणजेच लेखन प्रमादामुळे चुका झालेल्या आहेत. अशा चुकांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तरी अशा चुका आपल्या ७/१२ उतार्‍यात असतील तर आपण संबधित मंडळ अधिकारी किंवा तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून चुकांची दुरुस्ती या कालावधीत करुन घ्यावी. असे राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here