पंढरपूर: भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांना काळे फासून साडी नेसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढीव वीज बिलांविरोधात आंदोलन करताना कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या रागातून शिवसैनिकांनी त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या तोंडाला काळे फासले होते.
वाढीव वीज बिलांच्या विरोधात भाजपनं शुक्रवारी राज्यभर आंदोलन केलं होतं. पंढरपूरमध्येही निदर्शनं करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. ‘शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्री झाले आणि आता करोना होईल म्हणून घरात बसतात,’ असं कटेकर म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. त्यावरून शिवसैनिकांमध्ये संताप होता.
शिवसेनेचे पंढरपूर शहरप्रमुख रवी काळे यांच्या नेतृत्वाखाली २५ हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी कटेकर यांना गाठून त्यांना शिवीगाळ केली. कटेकर यांना चपलांचे हार घातले आणि साडी नेसवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळं पुढील अनर्थ टळला. त्यानंतर भाजपनं शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शिरीष कटेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४९, ५०० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.