जळगाव ः प्रतिनिधी
तालुक्यातील नवीन रायपूरला लागूनच असलेल्या कुसुंबा गावाला वीज पुरवठा करणारी डिपी काढण्यात आली. यामुळे पुरेसा विद्युत पुरवठा होत नसल्याने रायपूर येथे गेल्या एक ते दीड महिन्यापासून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पुन्हा डीपी बसविण्यास वीज वितरण कंपनीकडून टाळाटाळ केली जात असून ग्रामपंचायत प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.
रायपूर गावाला लागूनच असलेल्या कुसुंबा गावाजवळच काही अंतरावर रायपूर येथे पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची विहिर आहे. तालुक्यातील रायपूर-कुसुंबा गावाला वीज पुरवठा करण्यासाठी जळगाव-औरंगाबाद महामार्गाला लागूनच डीपी बसविण्यात आली होती. परंतु महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे व अडथळा ठरत असल्यामुळे ही डीपी काढण्यात आली. यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून वारंवार मागणी करुन देखील वीज वितरण कंपनीतर्फे दुसरी डीपी बसविण्यात आली नाही. यामुळे पुरेसा विजेचा पुरवठा होत नसल्यामुळे रायपूर येथे गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील याची दखल घेतली जात नाही. या समस्येकडे वीज वितरण कंपनी व रायपूर ग्रामपंचायततर्फे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे गेल्या एक ते दीड महिन्यांपासून ग्रामस्थांचे अतोनात हाल होत असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. म्हणून आज रोजी महिलांसह ग्रामस्थांतर्फे रायपूर ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. व लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करून ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी यावेळी महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली. ग्रामस्थांच्या समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांतर्फे देण्यात आला.
वीज वितरण कंपनीतर्फे टाळाटाळ
डीपी अभावी रायपूर येथे तीव्र पाणीटंचाई भासत असल्यामुळे पर्यायी डीपी बसविण्यात यावी, या मागणीसाठी रायपूर ग्रामपंचायत प्रशासनातर्फे वारंवार तक्रार व मागणी करून देखील वीज वितरण कंपनीतर्फे नवीन डीपी बसविण्यास टाळाटाळ केली जात आहे, अशी माहिती ग्रा.पं.प्रशासनातर्फे देण्यात आली.