पोलिसांचे वाहतूक नियंत्रण गाडीत बसून

0
15

जळगाव ः विशेष प्रतिनिधी
जळगाव शहरातील वाहतूक समस्या अत्यंत गंभीर आहे .या बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी महत्वाच्या चौकात स्वयंचलित सिग्नल्स बसविण्यात आले आहेत.त्यातील जवळपास बहुतेक बंद अवस्थेत दिसून येतात.परिणामी वाहतूक नियंत्रणाचे काम स्वतः पोलिसांनाच करावे लागते.त्यात वेळेची बचत म्हणावी किंवा काही म्हणा,जळगाव वाहतूक पोलीस शाखेने वाहनात बसूनच वाहतूक नियंत्रित करण्याची अनोखी अन् काहीशी गमतीशिर पद्धत सुरू केली आहे.
जळगाव वाहतूक पोलीस शाखेच्या या नव्या पद्धतीचा सुरुवातीस थोडाफार परिणाम जाणवला खरा,परंतु आता वाहतूक पोलिसांची ही पद्धत म्हणजे गमतीचा विषय म्हटली जात आहे .लोकांनी त्यास “उंटावरून शेळ्या हाकण्याचा “प्रकार असे नाव ठेवत या पद्धतीची खिल्ली उडवणे सुरू केले आहे. शहरातील प्रचंड वाहतूक,नागरिकांची नको तशी गर्दी, त्यात रस्त्यावरील अतिक्रमणाचा व्याप ,वाहन चालकांचा बेशिस्तपणा,कुठेही वाहने पार्क करण्याची घाणेरडी पद्धत.हा सारा प्रकार पाहता वाहतूक पोलिसांनी चौकआणि वर्दळीच्या रस्त्यात गस्त घालून वाहतूक नियंत्रण करणे अगत्याचे ठरते किंबहुना तशीच पद्धत योग्य म्हणावी लागेल.
परंतु ,जळगाव वाहतूक शाखेचे पथक अत्यंत गजबजलेला परिसर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक,शास्त्री टॉवर चौक,साने गुरुजी चौक,घाणेकर चौक, भिलपुरा चौक आणि पुढे असोदा रस्ता हा संपूर्ण महात्मा गांधी रोड .आणि साने गुरुजी चौकापासून दाणा बाजार मार्गे कोंबडी बाजार पर्यंत चा शिवाजी रोड तसेच पोलन पेठ,शास्त्रीटॉवर पासून काँग्रेस भवन ,पुष्पलता बेंडाळे चौक ,राजकमल टॉकीज पासून सुभाष चौक या संपूर्ण परिसरात पोलिसांच्या वाहनात बसून वाहतूक नियंत्रण ,व बेशिस्त वाहनधारकांना सूचना देत पुढे -पुढे जाते.ही अनोखी पद्धत सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
वास्तविक वरील सांगितलेला संपूर्ण परिसर शहराची प्रमुख बाजारपेठ असलेला भाग आहे.याच परिसरात महत्वाची व्यापारी प्रतिष्ठाने,बँका, महापालिका भवन,कोट्यवधींची उलाढाल होणारा दाणा बाजार ,सिनेमा थिएटर्स ,महापालिकेची फुले,सेंट्रल फुले मार्केट,चौबे मार्केट,महात्मा गांधी मार्केट ही संकुले तसेच शेकडो दुकाने असलेली खाजगी व्यापारी संकुले आहेत.त्यावरून हा भाग किती वाहतूक आणि गजबज असलेला असेल हे लक्षात येते. त्यात कुठेही वाहनतळांची उपलब्धता नसल्याने वाहनधारक ,दुकानात येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर लावतात.परिणामी वाहतुक कोंडी होणे नित्याचेच झाले आहे.
या संपूर्ण परिसरात दुपारी आणि संध्याकाळच्या सुमारास वाहतुक पोलिसांचे वाहन हळू-हळू मार्गक्रमण करते व त्यातुन अर्थात चालत्या गाडीतून ध्वनिक्षेपकावर वाहन- धारकांना सूचना दिल्या जातात.ए रिक्षावाल्या, कारे फळ गाडीवाल्या ,ए मोटारसायकल तुला समजत नाही काय?, गाडी कशी लावतो.चालत्या वाहनातून असे हे काम चालते.केव्हा तर आत बसलेले साहेब इतक्या जोरात ओरडतात की,जसे शिक्षक विद्यार्थ्याला रागवतात. अगदी तसेच.
वाहतूक नियंत्रणाच्या या पद्धतीचा सुरुवातीस थोडाफार फरक जाणवला खरा, पण आता लोकांना त्याची गम्मत वाटायला लागली असावी.कारण, पोलीस गाडीतून आवाज आल्यावर वाहनधारक फक्त सरकल्यासरखे करतात.गाडी पुढे गेली की, पुन्हा तसेच म्हणजे अनियंत्रित.या प्रकाराला लोक“उंटावरून शेळ्या हाकण्याचा“प्रकार म्हणू लागले आहेत. त्यापेक्षा दोन-दोन वाहतूक पोलीस या परिसरात पायीच फिरले तर त्याचा वचक बसेल,लोकांना “वर्दीचा दम“सुद्धा वाटेल.आणि इंधन बचत होणार हा भाग वेगळाच.यात लोकांना, वाहनधारकांना शिस्त सुद्धा लागेल,बेशिस्तपणा कारणारांवर “मेमो“चा बडगासुद्धा बसविता येईल.खरोखर वरील बाजारपेठेच्या भागात बेशिस्तपणा आणि चेन ओढणे,पाकीट मारी सारख्या घटनांवर आळा बसेल.बाजारपेठेत या घटनाही सातत्याने घडत असतातच.पोलीस अधीक्षकांनी या अनोख्या वाहतूक नियंत्रण पद्धतीचा आढावा घ्यावा व शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्यासाठी सक्षम वाहतूक यंत्रणा सज्ज करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here