मुंबई :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेला दोन मोठ्या नेत्यांनी सोडचिट्ठी दिली . या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर केडीएमसीचे मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठे धक्के बसल्याची चर्चा झाली.या सगळ्या परिस्थितीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कुठे तरी कमी पडल्याचे चित्र आहे . या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राजू पाटील यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
कालपासून डोंबिवलीतील काही जणांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि त्या प्रवेशांना विविध माध्यमांद्वारे वारंवार दाखविल्यामुळे त्याची बातमी झाली. कोणत्याही संघटनेतून कोणीही गेले तरी संघटना ही कायम कार्यरतच असते. आपल्या पक्षाने या आधीही अनेक मोठ-मोठी पक्षांतरं अनुभवली आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे की, कोणीही गेला तरी आपला महाराष्ट्र सैनिक हा राजसाहेबांवर कायमच श्रद्धा ठेवून कार्यरत असतो , असे नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.