शिवचरित्रातून मिळते महिलांचा आदर करण्याची प्रेरणा 

0
26
भुसावळ -(राकेश कोल्हे )  स्वराज्य उभारणीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सामावून घेतले. परंतु सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेली कठोर पावले म्हणजे स्त्रीमुक्तीसाठी केलेली क्रांतीच होती. महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील, असे प्रतिपादन हभप गंगाधर महाराज कुरूंदकर (हिंगोली) यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात ‘शिवरायांचा महिलाविषयक दृष्टिकोन’ या विषयावर हभप कुरूंदकर बोलत होते. हभप गंगाधर महाराज यांचा परिचय डॉ. जगदीश पाटील यांनी करून दिला. हभप कुरूंदकर यांनी ‘शिवराय मनामनात’ हे गीत म्हटले. त्यानंतर ते म्हणाले की, तुकोबांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनमुक्ती व जनआंदोलन केले. त्यांना संत नामदेव महाराज यांनी समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम कीर्तन दिलेले होते. छत्रपती शिवरायांना विविध भाषांचे ज्ञान होते. शिवरायांच्या मनात महिलांबद्दल उच्च प्रतीचा मानसन्मान होता. शिवाजीराजांचे महिलाविषयक धोरण अत्यंत आदराचे होते. महिलांचा आदर त्यांच्या रक्तात भिनला होता. मातोश्री जिजाबाई त्यांच्या पहिल्या गुरू होत्या. जिजाऊंनी बालशिवबाला महिलांच्या सन्मानाचे बाळकडू पाजले होते. म्हणून परस्त्रीस मातेसमान लेखणारा व शत्रूच्या स्त्रियांचा सन्मान करणारा हा युगपुरूष आपल्या देशात आजही प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. महिलांना मोहिमेवर आणू नये, त्यांना युद्धात पकडू नये. महिलांसंबंधी गुन्ह्याला क्षमा नव्हतीच तर कठोर शिक्षा होती. साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार कुणालाही माफी नव्हती. हातपाय तोडणे, देहदंड, डोळे काढणे आदी शिक्षा दिल्या जात. ज्या काळात युद्धामध्ये हरल्यानंतर शत्रूच्या स्त्रियांची विटंबना केली जाई, त्या काळात शिवाजी राजे स्त्रीरक्षक होते. त्यांनी महिलांना संरक्षण दिले होते. राजांनी जे महिलाविषयक धोरण आखले, ते अमलातदेखील आणले. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी मानसन्मान देऊन परत पाठविले. तसेच रांझेगावाच्या पाटलाला त्यांनी हातपाय तोडण्याची शिक्षा दिली व सर्व महिलांना अभय दिले. हिरकणीचे धैर्य पाहून कड्याला हिरकणी असे नाव देऊन तिचा सन्मान केला. अशा महिला स्वराज्यात असताना शत्रूला चाल करण्याची एकही संधी मिळणार नाही, ही बाब शिवाजी महाराज ओळखून होते, असेही हभप गंगाधर महाराज म्हणाले. सर्वात शेवटी त्यांनी शिवरायांची आरती व पसायदान म्हटले. सूत्रसंचालन संध्या भोळे यांनी तर आभार अमितकुमार पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here