जळगाव ः प्रतिनिधी
शहरात सगळ्यात मोठी समस्या रस्त्यांची आहे. त्यात आता ४२ कोटींच्या निधीसाठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन लवकरच अडचणींवर मात करत दोन महिन्यात ७० कोटींच्या रस्त्यांच्या कामांना सुरूवात करण्यात येईल, अशी घोषणा आमदार राजूमामा भोळे यांनी केली आहे. शहराच्या विकासासाठी सर्वच क्षेत्रातील २५ जणांची समिती स्थापन करून त्या माध्यमातून या कामांना चालना देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शहरातील नागरीक आता लोकप्रतिनिधींकडून केवळ रस्ते दुरूस्तीची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. गेल्या अनेक वर्षात कोणत्याही ठोस विकास कामांना सुरूवात नसलेल्या शहरात चालणेही कठीण झाले आहे. नगरसेवकांपासून आमदारांपर्यंत केवळ रस्ते दुरुस्तीची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भोळे यांनी केशवस्मृती प्रतिष्ठान आयोजित आधुनिक शवदाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यास नागरीकांशी संवाद साधला.
आतापर्यंत प्रामाणिकपणे काम करत आलो आहोत. रस्त्यांची अडचण मोठी आहे. परंतु, त्यासाठी ४२ कोटींच्या निधीला तांत्रिक अडचण निर्माण झाली असून ती सोडवण्यााठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मदत करावी, असे आवाहन केले.
शासन पातळीवर निर्माण झालेल्या अडचणी सुटल्यास सर्वांना विश्वासात घेऊन दोन महिन्यात ७० कोटींची रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, असेही ते म्हणाले. शहरातील रस्ते आणि गाळे प्रकरण हे दोन मोठे प्रश्न आहेत.
ते सोडवण्यासाठी मदत होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. जळगाव शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासकीय, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जाणकारांच्या २५ जणांची समिती गठीत करून त्यामाध्यमातून विकास साधण्याची संकल्पनादेखिल आमदार भोळे यांनी मांडली.