आदिवासी विकासचा दिलेल्या पैश्यासंदर्भात खात्यांचा आढावा मागवा; अन्यथा निधी बंद करा – डॉ.चंद्रकांत बारेला

0
44
चोपडा – एकात्मिक आदिवासी विकास खात्यातून दरवर्षी कृषी, वीज मंडळ, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम अशा विविध ठिकाणी विकासात्मक धोरण अवलंबाकरीता मोठ्या प्रमाणात निधी वळवला जात असतो, मात्र पुढे त्या निधीचे काय होते ? तो योग्य त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात वापरला जातो अथवा नाही, त्याचा पाठपुरावा होत नाही किंवा त्या – त्या विभागाचे अधिकारी त्यांचा आढावा इकडे सादर करीत नाहीत, यापुढे संबंधित खात्याने निधी वापराचा आढावा आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या बैठकीत जातीने हजर राहून द्यावा, अन्यथा हा निधी देणे बंद करा, तसा ठराव आजच करा अशी सुचना आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ.चंद्रकांत बारेला यांनी यावल येथील प्रकल्प समितीच्या आयोजित बैठकीत प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना केली.
दि.१७ रोजी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे प्रकल्प समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत बोलतांना डॉ.चंद्रकांत बारेला यांनी प्रकल्प कार्यालयाच्या कर्मचारी वर्गांना शिस्त लावण्यापासून सुरुवात करीत, सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी आधी अजेंडा देण्याची व त्या अजेंड्यावर मिटिंग मधील चर्चेचे विषय नमूद करण्याची पद्धत असते याची जाणीव करून दिली. यापुढे अजेंड्याशिवाय मिटिंग बोलवू नये जेवणाचे टेंडर या अतिमहत्वाच्या मुद्यावर बोलतांना डॉ.बारेला यांनी आश्चर्य व्यक्त करीत म्हटले की, तीन व्यक्ती संपूर्ण जिल्ह्याचे टेंडर घेऊन जिल्ह्याला चालवतात, कशाला कशाचा थांगपत्ता नाही, आदिवासी मुलांच्या तोंडचा घास कोणाच्या घशात घातला जातोय याची संपूर्ण कल्पना आहे. आजवर जे झाले ते यापुढे खपवून घेतले जाणार नाही. सर्व शाळांवर जेवणाचे मेन्यू फलक व त्यानुसार दररोजचा आहार वाटप करणे ही शिस्त लावून घेणे. ज्या शाळांची तक्रार आम्ही प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली असेल, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा असतांना जर कारवाई होत नसेल तर मात्र प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्नशील राहणार आहे.
विष्णापूर येथील आश्रमशाळा दुरुस्ती, शाळाबाह्य मुले या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. विना परवानगी अथवा योग्य कारणाशिवाय जे शिक्षक शाळेत गैरहजर राहत असतील त्यांच्यावर कारवाई करावी Neet – Jet परीक्षेकरीता आदिवासी विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रकल्पस्तरीय व्यवस्था करून देण्यात यावी. न्यूक्लिअर बजेट अंतर्गत व्यक्तिगत लाभार्थी संख्या वाढवावी, लाभार्थी निवड ही पारदर्शक असावी, शबरी घरकुल योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजूंना मिळावा अशा विविध सकारात्मक मागण्या बैठकीत प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांनी केल्या. याप्रसंगी यावल प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, प्रकल्प समिती सदस्य मासुम तडवी, एम.बी.तडवी, रतन बारेला, प्रताप खाज्या पावरा, संजू जमादार, निलेश जाधव व प्रकल्प कार्यालयातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here