यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच यांचा मुलगा यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात यावल तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत मधील नमुना नंबर 8 व 9 चे वाचन करून शासकीय कामकाजाचा नवीन विक्रम केला असल्याची तक्रार दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दि.९ फेब्रुवारी २०२२ रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, यावल तालुक्यातील दुसखेडा येथील घरकुलाची “ड” यादी ही शासनाकडून मंजुर झाली आहे. मंजूर घरकुलांच्या यादीचे वाचन हे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन करावी लागते परंतु विद्यमान ग्रामसेवक हे आज सुटीवर असून सुद्धा दुसखेड़ा ग्रामपंचायतीचे दप्तर नमुना नंबर आठ व नमुना नंबर नऊ हे भुसावळ शासकीय विश्रामगृहात घेऊन गेले व सरपंच यांचा मुलगा व ग्रामसेवक यांनी विश्रामगृहात त्या मंजूर घरकुल यादीचे वाचन केले,म्हणजे घरकुल यादीचे वाचन हे ग्रामपंचायत मध्ये आणि ग्रामसभेत न करता आपल्या सोईनुसार मनमानी करून अनाधिकृत ठिकाणी यादीचे वाचन केले याची आम्हाला माहिती झाल्यावर आम्ही खालील सह्या करणारे भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात गेले असता त्या ठिकाणी ग्रामसेवक व सरपंच यांचा मुलगा मंजुर घरकुल यादी ची छाननी करीत असताना आम्ही प्रत्यक्ष बघितले.तरी यांनी शासकीय सर्व नियम धाब्यावर ठेवून घरकुल यादीचे वाचन दुसखेडा ग्रामपंचायत येथे न करता दुसऱ्या तालुक्यात म्हणजे भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात केले असे दिलेल्या तक्रार अर्जात दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच जगन्नाथ धुडकु पाटील,ग्रामपंचायत सदस्य सुभाष दगडू सोनवणे,महेंद्र गंगाराम बारे यांनी नमूद केले आहे त्यामुळे आता यावल पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष गटविकास IAS अधिकारी नेहा भोसले काय कार्यवाही करतात याकडे यावल तालुक्यातील संपूर्ण ग्रामसेवकांचे,राजकारणाचे,दुसखेडा ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.