जळगाव ः प्रतिनिधी
पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन, जळगाव जिल्हा या संघटनेची शासन दरबारी नोंदणी होऊन महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेने संलग्नता दिली आहे. राज्य संघटनेचे विविध गटातील स्पर्धेचे आयोजनाबाबत परिपत्र प्राप्त झाले असून त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष फारूक शेख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
दरम्यान, नूतन मराठा महाविद्यालयात संघटनेचे व्हॉलीबॉल क्रीडांगण सुरू करण्यात आले असून त्याचे विधिवत पूजन सर्वात लहान खेळाडू प्रेम क्षत्रिय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष मंजुषा भिडे, सचिव अंजली पाटील, विनोद पाटील, मिलिंद काळे , इफतेखार अहमद शेख, दर्शन आटोळे, जाहेद शेख, भाऊसाहेब पाटील, बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मीक पाटील, सोमेश आटोळे यांच्यासह खेळाडू उपस्थितीत होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सायंकाळी नूतन मराठा महाविद्यालयातील मुख्य पटांगणात नव्याने तयार करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल मैदानाची पूजा करून खेळ सुरू करण्यात आला. यावेळी संघटनेची बैठक घेऊन पुढील काळात स्पर्धा व दैनंदिन सराव बाबत चर्चा करून जास्तीत जास्त मुले व मुली खेळाडू तयार व्हावेत, व्हॉलीबॉल खेळाचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशाने चर्चा करण्यात आली.