जळगाव, प्रतिनिधी । तत्त्वज्ञान, विज्ञान अन् आध्यात्मिक गुरू स्वामी विवेकानंद यांचे साहित्य, पुस्तके व विचार सर्वांसाठी आजीवन प्रेरणादायी असून, ते विशेषतः युवकांसाठी अतिशय मार्गदर्शक आहेत. सद्यःपरिस्थितीत डिजिटल युगामध्ये जेथे चिथावणीखोर वक्तव्ये होतात अशा वेळी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे साहित्य, पुस्तके ही युवकांसाठी मार्गदर्शक ठरतात. जीवन म्हणजे प्रत्यक्ष वाटचालीची परीक्षा आहे. तिला प्रत्येकानेच धैर्याने सामोरे जाऊन निश्चितपणे यश संपादन केले पाहिजे. मात्र, त्यासाठी जळगावसह प्रत्येक खेड्या-पाड्यात वाचन संस्कृती वाढीस लागायला हवी. या कार्याच्या प्रचार अन् प्रसारासाठी आपल्या संस्थेसह या कार्यात सेवारत असलेल्या सर्वांना समस्त जळगावकरांतर्फे मनस्वी शुभेच्छा देते, अशी भावना महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन यांनी व्यक्त केली.
साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे तसेच पाश्चात्त्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेलेले व्यक्तिमत्त्व व युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या साहित्य विक्रीच्या पुण्यातील रथाचे आज बुधवार, दि.2 फेब्रुवारी 2022 रोजी शहरातील काव्यरत्नावली चौकात सकाळी साडेदहाच्या सुमारास आगमन झाल्यानंतर त्यांनी त्याचे यथोचितपणे स्वागत केले, याप्रसंगी त्या बोलत होत्या.
महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन यांनी सुरूवातीला स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून या साहित्य विक्री सोहळ्याचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पुणे व जळगाव येथील श्री रामकृष्ण मिशन मठाचे अध्यक्ष तसेच सेवेकर्यांचा गुलाबपुष्प देत सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तर पुणे व जळगाव येथील श्री रामकृष्ण मिशन मठाच्या पदाधिकार्यांकडूनही महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांचे स्वामी विवेकानंदांवरील काही पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले. त्यानंतर महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ. जयश्री महाजन यांनी स्वामी विवेकानंदाच्या जीवनावरील पुस्तकांचे अवलोकनही केले.
याप्रसंगी पुणे येथील श्री रामकृष्ण मिशन मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकान्तानंद, स्वयंसेवक प्रशांत लेले, वाहनचालक संदीप शिंदे तसेच जळगावातील रामकृष्ण मिशनचे सर्व भक्त अनुक्रमे प्रा. डॉ. रमेश झोपे, झोपे, श्रीकांत देशपांडे, श्रीधर इनामदार, प्रकाश गलवडे, डॉ. शशांक झोपे, झोपे, विवेक खडसे आदींसह नागिरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्य खरेदीचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी
स्वामी विवेकानंदांवरील साहित्य विक्री रथ उद्या गुरुवार,दि.3 फेब्रुवारी 2022 रोजीही काव्यरत्नावली चौकातच सकाळी 9 ते रात्री 8.30 यावेळेत उभा असेल. हा रथ रविवार, दि.20 फेब्रुवारी 2022 पर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्री 8.30 या वेळेत नियोजनाप्रमाणे ठरवून दिलेल्या शहरातील भागात उभा असणार आहे. त्यामुळे जळगावकरांना स्वामी विवेकानंदांवरील साहित्य खरेदीचा आनंद घेता येणार असल्याने या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे श्री रामकृष्ण मिशनच्या सर्व भक्त परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.