अहमदनगर : वृत्तसंस्था
अहमदनगर- कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आह. ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप रिक्षा आणि ट्रकला धडक दिली. मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याणकडे जाणारा पीकअप व्हॅन आणि कल्याणकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर- कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपासमोर ही घटना घडली आहे. रिक्षा ओतूरकडे जात असताना समोरुन येणाऱ्या पिकअपने रिक्षाला धडक मारली. या धडकेत रिक्षामधील चालक आणि दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला तसेच पिकअप चालक स्वतः आणि कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि मागे बसलेला हमाल यांचा जागीच मृत्यू झाला.
बळीराजाच्या कुटुंबावरकाळाचा घाला
भाजीचा पिकअप हा भरधाव वेगात होता. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात भाजीच्या पिकअपमधील पाच आणि रिक्षातील तीन असा आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातातील एकूण पाच लोकांची ओळख पटली असून तीन लोकांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.आठही जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ओतूर येथील रुग्णालयात पाठवले आहेत.अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे – गणेश मस्करे (३०), कोमल मस्करे (२५), हर्षद मस्करे (४), काव्या मस्करे (६), अमोल मुकुंदा ठोके, नरेश नामदेव दिवटे (६६), (अन्य दोन जणांची नावे अद्याप समजलेली नाहीत.)
