६७ वर्षीय वृद्धाकडून मतिमंद तरूणावर अनैसर्गिक अत्याचार
पाचोरा ( प्रतिनिधी)-
तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय मतिमंद तरूणावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २१ मार्च रोजी सायंकाळी घडली. ६७ वर्षीय वृद्धाने हे कृत्य केल्याचा आरोप असून घटनेनंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
पाचोरा तालुक्यातील एका गावातील बसस्थानकाजवळ ३० वर्षीय मतिमंद युवक फिरत होता. याचवेळी गावातील वृद्धाने त्याला गोड बोलून जवळच्या शेतात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हे त्या परिसरात मधमाशांचे पोळे काढण्यासाठी गेलेल्या काही युवकांनी पाहिले. त्यांनी हस्तक्षेप करत वृद्धाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फरार झाला.
पीडित मतिमंद तरूणाच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाण्यात हा प्रकार सांगितला. नंतर घटनास्थळी असलेल्या युवकांनी काढलेले चित्रिकरणही पोलिसांना सुपूर्द केले. पो नि अशोक पवार यांनी गंभीर दखल घेत पथक तयार केले. पो काॅ संदीप राजपूत आणि वाहनचालक समीर पाटील यांनी सापळा रचून ६७ वर्षीय आरोपीला अटक केली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.