भुसावळात दोघांकडून २ गावठी कट्टे, ७ जिवंत काडतूसे जप्त
भुसावळ (प्रतिनिधी) –
येथील तार ऑफिस परिसरातील एका हॉटेलजवळ शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने २ तरुणांकडून त्यांच्या कमरेला लावलेले २ गावठी कट्टे आणि सात जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांना माहिती मिळाली होती. तार ऑफिसजवळील हॉटेल जवळ पथकाने सापळा रचला. तेथे एक तरुण संशयास्पद स्थितीत उभा होता.त्याला विचारपूस केल्यावर त्याच्या झडतीत १ गावठी कट्टा व ४ जिवंत काडतूसे सापडली. त्याचे नाव ऋतिक निंदाने (वय २४, रा.वाल्मिक नगर भुसावळ) आहे. तो आणखी एकाची वाट पाहत होता. पोलिसांनी तेथेच थांबून त्या तरुणाची वाट पाहिली व त्यालाही ताब्यात घेतले.
या दुसऱ्याचे नाव सुमित सोलसे (वय २५ रा. डॉ. आंबेडकर नगर, भुसावळ) आहे. त्याच्याही झडतीतून १ गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली ही कारवाई उपनिरीक्षक विजय गायकवाड, विनोद नेवे, दीपक कापडणे, जाकीर मंसूरी, दीपक शेवरे, राहुल भोई, भूषण चौधरी, सुबोध मोरे, संजय ढाकणे, गजानन पाटील, राहुल बेनवाल यांनी केली.