पुणे : प्रतिनिधी
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस दलातील नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरला ललित पाटील पुण्यातील ससुन रुग्णालयातून पळून गेला होता, तेव्हा हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या १६ नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक कालेल्या या दोन पोलीस कॉन्स्टेबलसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर आर्थोपेडीक सर्जन प्रविण देवकाते यांचे चौकशी अंती निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र मॅटचा निकाल विरोधात गेल्याने डॉक्टर संजीव ठाकूर पदमुक्त होणार हे स्पष्ट झालेले असताना त्यांना पुन्हा पदमुक्त करण्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांचा आदेश म्हणजे धुळफेक असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. चौकशी समितीला दोषी आढळलेल्या या दोन्ही डॉक्टरांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.