रायपूर : वृत्तसंस्था
देशांतर्गत क्रिकेटमध्ये रियान परागची दमदार कामगिरी सुरूच आहे. रायनने रणजी ट्रॉफी हंगामातील पहिल्याच सामन्यात आसामसाठी तुफानी खेळी केली आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात रायनने रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. पहिल्या डावात स्वस्तात बाद झाल्यानंतर आसामचा संघ छत्तीसगडविरुद्ध फॉलोऑन खेळत आहे.
रायनचे ५६ चेंडूत शतक
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या २२ वर्षीय अष्टपैलू रायन परागने अवघ्या ५६ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने ७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे. त्याने झारखंडविरुद्ध अवघ्या ४८ चेंडूत शतक झळकावले.
रायनची बॅट इथेच थांबली नाही. त्याने ८३ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या. रायन ८७ चेंडूत १५५ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत १२ षटकार आणि ११ चौकार लगावले. या खेळीत रायनला ४ वेळा जीवदान मिळाले.