यावल ः प्रतिनिधी
येथील नगरपरिषद कार्यक्षेत्रात विकसित भागासाठी ५ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या वैशिष्ट्यपूर्ण व १४ वा वित्त आयोग योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या जलकुंभ, रायझिंग (मेन जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नवीन पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन) व वितरण व्यवस्थेसाठी जलवाहिनी टाकण्याची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आता पुर्णत्वास आली आहे.
याबाबत यावल नगरपालिका माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, यावल नगरपरिषदेची हद्दवाढ सन २०१० मध्ये करण्यात आली होती. त्यामुळे या भागातील काही वसाहती वगळता इतर भागांमध्ये खाजगी विहिरीवरून पाणीपुरवठा केला जात होता. या भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठा बाबतच्या अडचणी लक्षात घेता विस्तारीत भागातील सर्व वसाहतींना नगरपरिषदद्वारा शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी शासकीय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून पाणी पुरवठा योजनेचे तीन टप्पे करण्यात आले. त्यापैकी १० लक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ ७४ लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आला होता व रायझिंग मेन जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नवीन पाण्याच्या टाकीपर्यंतचे काम एक कोटी १६ लाख रुपये करण्यात आले होते. त्यानंतरचा तिसरा टप्पा वितरण व्यवस्थेसाठी एचडीपीई पाईप टाकणे सुमारे ३ कोटी ६५ लाख रुपये असा एकूण पाच कोटी ७५ लाख रुपयांचे काम हाती घेण्यात आले होते. या योजनेचे काम वैशिष्ट्यपूर्ण योजना तसेच १४ वा वित्त आयोग योजनेतून पूर्ण करण्यात आलेले असून यामुळे विस्तारीत भागातील सुमारे २७ वसाहतींना पूर्ण दाबाने शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेमुळे नगरपरिषदेला पाणीपट्टीद्वारे सुमारे १५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न प्राप्त होणार आहे.
ज्या नागरिकांकडे नगरपरिषदेचे नळ कनेक्शन नाही अशांनी अर्ज मागणी करून व रितसर फी भरणा करून तात्काळ नवीन नळ जोडणी करून घ्यावी, असे आवाहन सुद्धा अतुल पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, विस्तारीत भागातील जुन्या जलवाहिनी वरून पाणीपुरवठा होणार्या सुमारे जुने ६५० ते ७०० नळ जोड़णी धारकांना नवीन टाकण्यात आलेल्या एचडीपीई पाईपलाईन वरून कुठलाही आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडून १५ व्या वित्त आयोग योजनेतून जुने नळ कनेक्शन स्थलांतरीत करण्याच्या योजनेस मंजुरी मिळाली.जुन्या नळ धारकांना मोफत नळ जोडणी देण्यात येणार आहे. महिनाभराच्या कालखंडात नवीन जलकुंभाद्वारे सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सक्रीय प्रयत्न सुरु आहे.
माझ्या प्रभागाची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना
पूर्णत्वास आल्याने वचनपूर्तीचा आनंद-अतुल पाटील
यावल नगरपरिषदेची सन २०१० मध्ये हद्दवाढ झाल्यानंतर विस्तारीत भागातून मी नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करीत आहे. विस्तारीत भागासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व्हावी व नागरिकांना नगरपरिषदेमार्फत हक्काचा पाणी पुरवठा व्हावा म्हणून प्रयत्नशील होतो, ही योजना जवळपास पूर्णत्वास आलेली असून स्वप्नपूर्तीचा, वचनपूर्तीचा आनंद आहे.