प्रतिनिधी | नाशिक
त्रिमुर्ती चौक व मायको सर्कलवरील येथील वादग्रस्त २५० कोटीच्या उड्डाणपुलांसाठी २०० वर्ष पुरातन वृक्षांसह तब्बल ५८८ वृक्ष तोडण्याच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मुख्य न्यायाधीशांच्या कोर्टात आज शुक्रवारी (दि. २८) दुपारी बारा वाजता तातडीची सुनावणी होणार अाहे. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज दुपारी साडेतीन वाजता प्रत्यक्ष पाहणी येथे करणार असल्यामुळे उड्डाणपुलाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. पर्यावरण प्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेत राज्य शासन, वनविभागाचे वनसंरक्षक तसेच नाशिक महापालिका अायुक्त कैलास जाधव, शहर अभियंता, मुख्य म्हणजे संपूर्ण वृक्ष प्राधिकरण समितीलाच प्रतीवादी करण्यात आल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. यापूर्वी भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी दाखल केलेल्या याचिकेचे रूपांतर जनहित याचिकेत करण्याचे आदेश दिल्यामुळे एकूणच प्रकरण चिघळल्याचे चित्र आहे.
उड्डाणपुलासाठी कोणतीही ठोस प्रक्रिया न राबवता ५८८ वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्याचा निर्णय झाला असून उंटवाडी येथील दोनशे वर्षे जुन्या वडाच्या फांद्या तोडण्याच्या नोटिसा लावण्यात आल्या. ही बाब उर्वरित. पान ४
वृक्ष तोडीच्या प्रक्रियेलाच हरताळ; पालिकेची अडचण वाढणार
नाशिकमधील वृक्षतोडीसंदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यात कोणते वृक्ष तोडावे आणि कोणते तोडू नये यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वृक्षतोडीची कार्यवाही याबाबत देखील मार्गदर्शन सूचना आहेत मात्र महापालिकेने मनमानी पद्धतीने शहरात वृक्षतोड सुरू केल्यामुळे हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे मत वृक्ष प्रेमीनी व्यक्त करीत उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. मुळात उड्डाणपुलाचे डिझाईन करतानाच किती वृक्ष तोडावे लागणार हे स्पष्ट असताना ठेका देण्याची घाई का केली या मुद्द्यावरून खुद्द आयुक्तच अडचणीत येण्याची शक्यता आहे.