जळगाव : प्रतिनिधी
शहरात गुरुवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा हा प्रयत्न आहे.
या तीन दिवस नियमांचे पालक करून आपण अनेकांना बाधित होण्यापासून वाचवू शकू. सध्या रुग्णांची संख्या खूप वाढलेली आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणेवर ताण येतो. त्या स्टेजपर्यंत जायचे नसेल तर आतापासूनच नियमांचे पालन
करून संसर्ग नियंत्रित करावा लागेल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगावकरांना केले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. लक्षणे नसलेले रुग्ण जास्त आहेत. रुग्णालयात दाखल कमी असतील. तरी प्रत्येक रुग्ण हा अनेक नागरिकांना बाधित करू शकतो. त्यामुळे इतर समस्या होऊ शकतात. ते टाळण्यासाठी सर्व उपाययोजना कसोशीने राबवाव्यात लागतील. त्या अनुषंगाने जळगाव शहरातील जनता, समाजसेवी संस्था व लोकप्रतिनिधींची मागणी होती. निर्बंध लावल्यास कोरोनाची साखळी तोडू शकतो. त्या दृष्टीने जनता कर्फ्यूची नियमावली आखून देण्यात आलेली आहे.
गुरुवारी रात्रीपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३ दिवस हा जनता कर्फ्यू राहील. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न आहे. एका बाधित व्यक्तीकडून दुसरीकडे संसर्ग जाण्यापासून रोखण्यास याची मदत होईल. इतरही बाबी पाळाव्या लागतील. ज्या ठिकाणी जनता कर्फ्यूची नियमावली अंमलात नाही,त्या ठिकाणीही मोठे समारंभ, गर्दीचे कार्यक्रम, बाजारपेठेतील गर्दी हे सर्व नियंत्रित करावे लागणार आहे. खासगी कोविड केअर सेंटर, खासगी रुग्णालयांना परवानगी दिलेली आहे. नव्या जोमाने त्यांची कार्यपद्धती सुरू होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा बराचसा ताण कमी होईल.
संस्थात्मक विलगीकरणावर भर
सर्व पर्याय खुले झाल्याने होम विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर देणार आहोत.रुग्णांनी शक्यतो कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे.त्यामुळे अनेक व्यक्तींना बाधित होण्यापासून वाचवू शकतो. विशेषत: स्वत:च्या कुटुंबीयांचे संरक्षण करू शकतो. सर्व नियमावली पाळा.लक्षण असल्यास लवकर तपासणी करून घ्या. कोविड केअर सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये आरोग्य परिस्थितीनुसार दाखल होऊन उपचार घ्या. त्यामुळे कोविडचा धोका टाळता येईल, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.