यावल ः तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील फैजपूर नगर परिषदेमार्फत फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन १९३६ चे संकल्प चित्र उभारणी करण्याच्या कामाच्या रकमेत लाखो रुपयांचा अपहार झालेला असल्याने अपहारीत रकमेची जबाबदारी निश्चित करून शासनाकडे कठोर कार्यवाहीची शिफारस करण्याची मागणी तक्रारदार ललीतकुमार चौधरी यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जळगाव यांच्याकडे केली आहे.
दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात श्री. चौधरी यांनी नमूद केले आहे की, दि.५ डिसेंबर २०१८ रोजी केलेल्या तक्रारीनुसार तसेच जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती नियुक्त चौकशी समिती अहवालानुसार तथा निष्कर्षानुसार एकाच निविदा प्राप्त मक्तेदार यांनी निविदा मॅनेज केलेले आहेत व सर्व स्पर्धक निविदांचे इसारा रक्कम एकाच खात्यातून भरलेले आहेत, निविदा करिता इसारा रक्कम संजय वाणी यांचे खात्यातूनच वर्ग झाल्याची चौकशी ‘छखउ‘ पडून होऊ न शकल्याने फैजपूर उपविभागीय अधिकारी यांनी वाणी यांना दोन वेळेस बँक स्टेटमेंट मागणी करूनही त्यांनी उपलब्ध करून दिलेले नाही.
तत्कालीन मुख्याधिकारी व अध्यक्षा व काही नगरसेवक यांचा मक्तेदार संजय वाणी यांचेशी संगनमत करून प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांनी अनुभवाची अट नजर अंदाज करून यांची निविदा बेकायदा मॅनेज केलेली आहे, संकल्प चित्राचे कुठलेही परिणाम वर्णन वापरण्यात येणारे साहित्य/ मटेरियल विनिर्देश/ ड्रॉइंग इस्टिमेट वगैरे व रक्कम रुपये ३० लाख ६५ हजारास कुठलाही आधार नगरपरिषद फैजपूर यांचे कडे तथा सादर प्रस्तावात नसतानासुद्धा महाराष्ट्र जिवन प्राधिकरण जळगाव यांनी एकत्रित रक्कम रुपये ७३ लाख ६८ हजार ८८९ रुपये करिता दिलेली तांत्रिक मान्यता व जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी दिलेली प्रशासकीय मान्यता बेकायदा आहे.
सदर साहित्य संकल्पचित्र खरेदी पूर्व साहित्याची तांत्रिक तपासणी, व वापरण्यात येणारे साहित्य, त्यांचा दर्जा/भाव तपशिलासह नोंदविणे/ निश्चित करणे व त्यानुसार न्यूनतम किंमत प्राप्त करून पुढील स्पर्धात्मक निविदा जाहीर/प्रक्रिया करणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रचलित पद्धतीनुसार आवश्यक होते. आणि तसे मुख्याधिकारी व कनिष्ठ अभियंता नगरपरिषद फैजपूर यांचा कॉंग्रेस अधिवेशन १९३६ संकल्पचित्र उभारणी च्या तक्रारीच्या खुलाश्यातील परिच्छेद क्र.३मध्ये मान्य केलेले आहे.त्यामुळे निविदेत नियोजितरित्या अनियमितता व अपहाराचा कट केलेला आहे.
प्रथम निविदा रद्द करताना शिल्पी क्रिएशन यांचेवर निविदा नियम अटीनुसार इशारा रक्कम जप्ती व वाढीव निविदा खर्चाबाबत शासन वसुली कार्यवाही केलेली दिसून येत नाही. यासह संकल्पचित्र मंच बांधकाम पूर्णत्वाची दिनांक यावरून नवीन नियुक्त अध्यक्षा,व काही नगरसेवक यांनी मुख्याधिकारी यांचेशी संगनमताने प्रथम निविदा रद्द करून संजय वाणी यांचे नावाने निविदा मॅनेज केलेली आहे असे स्पष्ट होते तरी आपणास विनंती आहे की, संजय वाणी हे चौकशीस असहकार्य करीत असल्याने बँक स्टेटमेंट मिळेपर्यंत त्यांची देयके थांबविण्याचे आदेश व्हावेत,कॉंग्रेस संकल्प चित्राचे अंदाजपत्रक, विनिर्देश नसताना केलेली देयके देऊन केलेला लाखो रुपयांचा अपहार रक्कम मक्तेदार, तत्कालीन मुख्याधिकारी व दोघे कनिष्ठ अभियंता,कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव, जिल्हा प्रशासन अधिकारी जळगाव यांचेकडून वसूल करण्यात येऊन सर्व संबंधित आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची शिफारस शासनाकडे करण्यात यावी.चौकशी समितीने आपले निष्कर्ष संदिग्ध असून शासन नुकसानीचा उहापोह केलेला नाही,अपहार रकमेची जबाबदारी निश्चित केलेली दिसून येत नाही तरी आपण हरित रकमेचे वसुलीची जबाबदारी निश्चित करूनच शासनाकडे कठोर कार्यवाहीची शिफारस करण्यात यावी असे दिलेल्या तक्रार अर्जात ललितकुमार चौधरी यांनी म्हटले आहे. तरी जिल्हाधिकारी जळगाव हे आपल्या वरिष्ठ अधिकार्यांकडे/ नगर परिषद प्रशासन मंत्रालयाकडे काय प्रस्ताव आणि अहवाल पाठवितात याकडे यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.