जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हास्तरीय समितीमार्फत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून कमाल १०० पात्र कलाकार व साहित्यिकांची निवड केली जाते. पात्र कलावंतांना दरमहा श्रेणी निहाय मानधन दिले जाते. त्यांच्या पश्चात त्यांच्या जोडीदाराला ते देण्यात येते. ज्या कलावंतांनी कलेच्या क्षेत्रात किमान १५ वर्ष सेवा करणार्या व वय ५० वर्षे पूर्ण आहे, ज्यांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही, असे साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवर यांच्यासाठी ही योजना असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांतून ५० वर्षावरील कलावंतांना मासिक मानधन सुवर्णसंधी अशी बातमी प्रसारित होत आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकार यांना मासिक मानधन देण्याची योजना सन १९५५ पासून राबवण्यात येत आहे. जिल्हा निवड समितीमार्फत सदर योजना राबवली जाते.
सदर योजनेसाठी पात्र कलाकार व साहित्यिकांची निवड करण्यासाठी पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे या समितीचे सदस्य सचिव असतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई हे समितीचे सदस्य सचिव असतात तर मुंबई व मुंबई उपनगर साठी समितीची निवड सांस्कृतिक कार्य मंत्री करत असतात. संबंधित जिल्हा निवड समिती यांच्यामार्फत दरवर्षी डिसेंबर महिन्या अखेरपर्यंत या योजनेसाठी अर्ज मागवण्यात येतात.
तसेच अर्ज मागवण्याची मुदत आवश्यकतेनुसार शासन मान्यतेने वाढविण्यात येते. त्यामुळे इच्छुक कलाकारांनी वर्तमानपत्रातून जिल्हा निवड समितीमार्फत जाहिरात, बातमी प्रसारित झाल्यावर, त्या ठिकाणी कलाकारांनी अर्ज करावे,असे सांस्कृतिक कार्य संचालयाने कळविले आहे.