१५ मार्चपर्यंत कापूस नोंदणी
हमीभावासाठी आवश्यक
जळगाव (प्रतिनिधी)-
किमान हमीभावाने सीसीआयकडे कापूस विक्रीला पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ मार्चपूर्वी सीसीआय केंद्राकडे नोंदणी आवश्यक असल्याचे पत्रक पणन सहसंचालक स्नेहा जोशी यांनी दिले आहे.
ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ च्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी पात्र ठरायचे असेल आणि एमएसपीचा लाभ मिळण्यासाठी सीसीआय केंद्रांकडे नोंद करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांना कापूस सीसीआयकडे विकता येणार नाही.
अमळनेरसारख्या तालुक्यात सीसीआयचे केंद्रच सुरू झालेले नाही. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी कोठे करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पात्र ठरायचे असेल तर धरणगाव , पारोळा तालुक्यात जावे लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा जाईल त्यामुळे गर्दी वाढून साईट जाम होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातील सीसीआय केंद्रांवर खरेदी बंद करण्यात आली आणि दुसरीकडे सीसीआय केंद्राकडे नोंदणीचे आवाहन केले जात असल्याने शेतकऱ्यांचा संभ्रम वाढला आहे.