जळगाव ः प्रतिनिधी
मनपातील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा बुधवारी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे सादर केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आता नवीन स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. आगामी अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी शिवसेना संघटना व पराभूत उमेदवारांपैकी कोणाला संधी मिळते हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
शिवसेनेसोबत अनेक वर्ष काम करणार्या अन्य सदस्यांना संधी देण्यासाठी काही दिवसांपासून स्वीकृत सदस्य बदलाच्या हालचाली सुरू होत्या.दरम्यान, संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जैन यांना राजीनामा देण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानुसार सोमवारी अमर जैन हे राजीनामा देण्यासाठी गेले होते. परंतु, आयुक्त सतीश कुलकर्णी नसल्याने ते माघारी परतले होते.
दरम्यान, जैन यांनी बुधवारी आयुक्त कुलकर्णी यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला आहे. येत्या महासभेत नवीन सदस्य निवडीसाठी पत्र सादर केले जाणार आहे. दरम्यान, शिवसेनेने एका वर्षासाठी संधी दिली होती.कोरोना काळातही सेवा करण्याची संधी मिळाली. अन्य सदस्यांना संधी मिळावी यासाठी संपर्कप्रमुख व पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर स्वीकृत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या अडीच वर्षात दीड कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली,असे अमर जैन यांनी सांगितले.
इच्छुकांच्या संख्येत वाढ
महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, निलेश पाटील, विराज कावडीया, शिवसेना महानगर संघटक दिनेश जगताप, नितीन सपके, जाकीर पठाण यांच्या नावांची चर्चा आहे.