स्वराज्य गाठण्यासाठी युद्धनितीच्या विविध तत्त्वांचा वापर 

0
61
भुसावळ प्रतिनिधी– कटकारस्थान करून शत्रूला नामोहरण करणे. शत्रू बेसावध असताना शत्रुसेनेला खिंडार पाडून पहिली तुकडी माघारी आल्यावर दुसऱ्या तुकडीला हल्ला करायला लावणे. अशा प्रकारच्या गनिमी युद्धनितीसह शिवरायांनी युद्धनितीच्या विविध तत्त्वांचा वापर युद्धात केला. शिवरायांनी स्वतःचे युद्धतंत्र विकसित करून स्वराज्य गाठले, असे प्रतिपादन शिवचरित्रकार चंदन पवार (जळगाव) यांनी केले.
भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवदर्शन सप्ताहात चतुर्थ पुष्प ‘शिवरायांची युद्धनिती’ या विषयावर श्री. पवार यांनी गुंफले. शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना डॉ. जगदीश पाटील यांची आहे. प्रारंभी शिवचरित्रकार चंदन पवार यांचा परिचय निशा पाटील यांनी करून दिला. श्री. पवार म्हणाले की, इतिहासात डोकावून पाहिले असता युद्धनितीचे वेगवेगळे प्रकार आढळून येतात. त्यात प्रकाश युद्धनिती, संरक्षक युद्धनिती, आक्रमक युद्धनिती, धर्म युद्धनिती, कूट युद्धनिती आणि गनिमी युद्धनिती यांचा समावेश होतो. छत्रपती शिवराय हे एक मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी शत्रूच्या मानसिकतेचा विचार करून अनेक किल्ले जिंकले. अंधश्रद्धाळू अफझलखान युद्धावर जाण्याआधी फकीरबाबांचा सल्ला घ्यायचा. शिवरायांना मारण्याचा विडा उचलल्यावर फकीरबाबाला डोळे बंद केल्यावर अफझलखानाचे फक्त धड दिसले. हे ऐकूनही त्याने माघार घेतली नाही. ही सर्व घटना शिवरायांना गुप्तहेराकडून माहिती झाल्यावर त्यांनी हत्ती मारणे, कावळे उडवणे आणि हिरवा ध्वज पाडणे असे अपशकुन घडवून आणले. त्यामुळे अफझलखानाचा रणात नाही पण मनात पराभव करून त्याचे मानसिक खच्चीकरण केले. तसेच शाहिस्तेखानाची बोटे कापून त्याचेही खच्चीकरण केले. शिवरायांनी स्वराज्य गाठण्यासाठी युद्धनितीचा विविध तत्त्वांचा वापर केला. मानसिक खच्चीकरण यासोबतच सूक्ष्म नियोजन, गनिमी डावपेच, चपळ सैन्य, पर्यायी व्यवस्था, दूरदृष्टी, भूगोलाचा सुयोग्य वापर, कमीत कमी सैन्याचा वापर, चकमा देणे अथवा फसवणे, सक्षम हेरखाते, सर्जिकल स्ट्राइक, सैनिकी शिस्त, मावळ्यांवर अतोनात प्रेम करणे असे युद्धनितीचे विविध तत्त्वे त्यांनी वापरले. त्यामुळे त्यांना स्वराज्याचा पल्ला गाठता आला, असेही शिवचरित्रकार चंदन पवार यांनी सांगितले. सूत्रसंचालन दिपाली भंगाळे धांडे यांनी तर आभार संजय ताडेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here