सोयगाव, प्रतिनिधी । सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी पिठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखाबाई काळे यांचे दोघांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सोयगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या आशाबी तडवी तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्याच सुरेखाबाई काळे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी विरोधी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने नगराध्यक्ष आशाबी तडवी आणि उपनगराध्यक्ष सुरेखा बाई काळे यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी संजीव मोरे यांनी
केली .
अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदाची घोषणा होताच शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे व जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकास लाडू – पेढे भरवून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेच्या वतीने मुख्यरस्त्याने विजयी मिरवणूक काढण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष , उपाध्यक्ष व सदस्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पहायला मिळाला.
सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या निवडणुकीत 17 पैकी 11 जागेवर शिवसेनेनं विजय मिळवीत स्पष्ट बहुमत मिळविले होते. भाजपच्या ताब्यातील ही नगर पंचायत आपल्या ताब्यात घेऊन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर गटनेता पदाच्या निवडणूक वेळी भाजपचे 6 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेत खेचून आणत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांना दुसऱ्यांदा धक्का दिला.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपला सूचक व अनुमोदक न मिळाल्याने ते अध्यक्ष पदासाठी अर्ज देखील करू शकले नसल्याने भाजपला सोयगाव मध्ये मोठी चपराक बसली असून भाजपवर मोठी नामुष्की ओढवली.
सत्ता स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सोयगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच सोयगावात छत्रपतींचा पुतळा उभारण्यात येईल. सोबतच सोयगावला स्वच्छ पाणी तसेच पायाभूत सुविधा व सोयगावच्या सर्वांगीण विकास साधण्यात नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवक कमी पडणार नाही असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
सोयगावच्या विकासासाठी नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी यापूर्वीच 5 कोटी निधी सोयगावला दिला. जवळपास 18 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला त्यांनी तत्वतः मान्यता दिली याबाबत मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मनात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यात धनुष्यबाण निशाणीवर सोयगावात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून सिल्लोड आणि सोयगाव येथे शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. भविष्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त करीत यासाठी शिवसैनिकांनी पेटून उठावे असे आवाहन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
यापुढे सर्व निवडणूका या शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली होतील असे स्पष्ट करीत येत्या काळात चंद्रकांत खैरे हेच खासदार असतील यासाठी शिवसैनिकांनी संकल्प करून सज्ज व्हावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सोयगावची निवडणूक यशस्वीपणे पार पडली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकच फटका मारला त्यात चकवा गायब झाला अशा शब्दांत माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी भाजप व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जोरदार समाचार घेतला. भाजपच्या 6 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेत आले आता उर्वरित दोघे ही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहे अशी माहिती देत सोयगाव मधून भाजप भुईसपाट होईल असे श्री. खैरे म्हणाले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, तालुकाप्रमुख प्रभाकर आबा काळे, तालुका संघटक दिलीप मचे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि.प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील पाटील, शहरप्रमुख अमोल मापारी, शिवा टोम्पे ( सिल्लोड ),शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, तालुकाप्रमुख धृपताबाई सोनवणे, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा जाधव, सिल्लोड प.स.सभापती डॉ. संजय जामकर, सुदर्शन अग्रवाल, माजी सरपंच सुरेखा तायडे, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, उस्मान खा पठाण, बाबू चव्हाण, दारासिंग चव्हाण, जि.प.माजी सदस्य कौतिकराव मोरे, सिल्लोड चे नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, शेख सलीम हुसेन, रतनकुमार डोभाळ, प्रशांत क्षीरसागर, सत्तार हुसेन, सुधाकर पाटील, मतीन देशमुख, सिल्लोड पं. स.सदस्य निजाम पठाण, राहुल सपकाळ, युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस शेख इमरान ( गुड्डू ) , सिल्लोड कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे , सतीश ताठे, माजी प.स.सदस्य मधुकर गवळी , नॅशनल सुत गिरणीचे संचालक मारुती वराडे, सिल्लोड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, पालोद चे सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, राजुमिया देशमुख आदीं पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.