जळगाव ः प्रतिनिधी
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोहाडी येथील शासकीय महिला रूग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. या ठिकाणी १०० खाटांचे कोविड रूग्णालय सुरू करण्याची तयारी सुरू आहे. सोमवार, ५ एप्रिलपासून येथे सर्व सुविधा उपलब्ध होणार असून या ठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
शासनाने २०१६-१७ या वर्षात जळगाव जिल्ह्यासाठी ७५ कोटी रूपयांचे स्वतंत्र महिला हॉस्पिटल बांधण्यास मंजुरी दिली होती. हे हॉस्पिटल बांधून तयार झाले आहे. हॉस्पिटलचे काम अंतीम टप्प्यात असतांना या ठिकाणी तातडीने १०० खाटांचे कोवीड हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे. याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली. १०० खाटांची तात्पुरती व्यवस्था केली असून गरजेनुसार येथे ८०० रूग्णांची व्यवस्था करणे शक्य असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, नगरसेवक अमर जैन, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, बांधकाम अभियंता सुभाष राऊत, बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील,शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक गणेश सोनवणे, सरपंच धनंजय सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा रूग्णालयाकडे हस्तांतरित
मोहाडी रोडवर उभारण्यात आलेले महिलांसाठीचे रूग्णालय आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा रूग्णालयाकडे हस्तांतरीत करण्यात आले. या रूग्णालयाच्या ए, बी, डी आणि ई विंग असे मिळून एकूण ८० हजार चौरस फुटांचे बांधकाम हे सार्वजनीक बांधकाम खात्याकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. सार्वजनीक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता सुभाष राऊत, कंत्राटदार पंकज बिर्ला उपस्थित होते.
तीन कोटींचा राखीव निधी
जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय गरज असेल त्या ठिकाणी तातडीने वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करणे, कोवीड रूग्णालय सुरू करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी ३ कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवला आहे. त्यातून अनेक ठिकाणी रूग्णांची व्यवस्था करणे शक्य होणार आहे.
पाईपलाईनने ऑक्सीजन
हॉस्पिटलमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून ऑक्सीजनचा पुरवठा करणार्याची व्यवस्था केली जात आहे. हॉस्पिटलमध्ये जनरल बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटीलेटर्स या तिन्ही प्रकारातील रूग्ण सेवा उपलब्ध राहणार आहे.
असे असेल हॉस्पिटल
शासनाने ७५ कोटी रूपयांचा निधी दिलेल्या या हॉस्पिटलच्या जागेत हॉस्पीटल,अधिकारी व कर्मचार्यांची निवासस्थाने, सुशोभीकरण आणि परिसरासाठी पाणी पुरवठा योजना आदींचा समावेश होता. हॉस्पिटल तब्बल एक लाख चौरस फुटाच्या क्षेत्रामध्ये उभारण्यात येत असून याचे बांधकाम हे भूकंपरोधक प्रणालीनुसार आहे. यातील तळ मजल्यावर स्वागतकक्ष, स्पेशल वॉर्ड तर दुसर्या आणि तिसर्या मजल्यावर ओपीडी, ऑपरेशन कक्ष आणि जनरल वॉर्ड आहे. फक्त महिलांसाठी असणारे हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पीटल असून कोविड सेवेच्या माध्यमातून ते सुरू होत आहे.