जळगाव ः प्रतिनिधी
शेतकरी हा संपूर्ण देशवासीयांचा पोशिंदा व अन्नदाता आहे. कृषी क्षेत्र हा आपला पाठीचा कणा आहे.असे असतांनासुद्धा केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तीन नवे कृषी कायदे संमत केले आहे. हे कायदे मुळातच देशभरातील शेतकर्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता हे विधेयके मंजूर केली आहे. या कायद्यांमुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर गुजराण करणार्या शेतकर्यांना हद्दपार करतील. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मोडतोड करून भांडवलदारांच्या ताब्यात देण्याची कृती सुरू आहे. कोरडवाहू आणि आर्थिक दृष्ट्या दुबळ्या असलेल्या शेतकर्यांना शेतमालाच्या हमीभावाचे जे कवच आहे ते गळून पडेल.
म्हणून यासंदर्भातील तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, दिल्लीत आंदोलक शेतकर्यांवर सुरू असलेली दडपशाही थांबविण्यात यावी या मागणीसाठी तसेच दिल्लीत शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द होण्यासाठीआंदोलन करणार्या शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे काल शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे तसेच याप्रसंगी केंद्र सरकारचा घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला.
यानंतर महामहीम राष्ट्रपतींना जिल्हाधिकायांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.याप्रसंगी सै. अयाजअली नियाज अली, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, दिनेश लखारा, सुरज गुप्ता,शफी ठेकेदार, सय्यद उमर, मुकेश परदेशी, शेख सलीम उद्दीन,मोहम्मद खान, इलियास नूरी, सय्यद इरफान, शेख शाकिब, मो. फारूक तेली, शेख वसीम, शेख नजीर उद्दीन, सय्यद ओवेश अली, शेख नदीम, शेख नूर मोहम्मद, सय्यद अता ए मोइन उपस्थित होते.