जळगाव ः छगनसिंग पाटील
बीएचआर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेत ठेवीदारांची फसवणूक करून व पर्यायाने त्या माध्यमातून संस्थेच्या मालमत्ता कवडीमोल भावाने बळकावल्या.त्यासाठी तसा घाट रचून अवसायक व इतरांनी संस्थेची व ठेवीदारांची फसवणुक केली. संघटितपणे, कट रचून संस्थेची व ठेवीदारांची फसवणूक केल्याने संबंधितांवर संघटित गुन्हेगारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.या सर्व घटनाक्रमात गुन्ह्यातील आरोपींशी गेल्या काळात आर्थिक व्यवहार असणार्या व्यक्तींचीही चौकशी होण्याची दाट शक्यता असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
या घोटाळा प्रकरणात मास्टरमाईंड व मोठा लाभार्थी असणार्या सुनिल झंवर यांचेशी या काळात आर्थिक व्यवहार असणार्या तसेच कर्जफेड करणार्या व्यक्तींची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शेकडो जण पोलीसांच्या रडारवर असून या यादीत असणार्यांच्या हालचालींवर तपास यंत्रणा पाळत ठेवून आहेत.
शहरातील अनेक व्यापारी व धनाढ्य व्यक्तींचे सुनिल झंवर यांचेशी मोठे आर्थिक व्यवहार या काळात झाल्याचे ऐकिवात आहे.घोटाळ्याच्या माध्यमातून मिळालेला काळापैसा शहरातील व्यापार्यांच्या माध्यमातून पांढरा केला जात होता अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. नव्हे तसे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागल्याचे समजते. अशांची यादी तयार करण्यात आली असून कुठल्याही क्षणी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले जाण्याची दाट शक्यता आहे.
बड्या नेत्याचे आशीर्वाद पाठीशी असल्याने सुनिल झंवर याचे बेकायदेशीर गोष्टी करण्यात चांगलेच धाडस बळावले होते. हे त्याचेकडे मिळून आलेल्या शंभराच्या वरील अधिकार्यांचे बनावट शिक्के,इतर दस्ताऐवज यावरुन लक्षात येते. माजी मंत्री गिरीष महाजन यांनी सुनिल झंवर यांचेशी असलेले संबंध नाकारलेले नाहीत. नव्हे तर आधी पासूनचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे झंवर याचेकडे सापडलेले महाजन यांचे कोरे लेटरहेड हे संमातिविना अथवा बनावट असूच शकत नाही अशी साशंकता जनमानसात व्यक्त होतांना दिसत आहे. या पत्रांचा, बनावट शिक्क्यांचा वापर कुठे, कसा केला गेला हे तपासात नक्कीच निष्पन्न होईल मात्र महाजन यांच्या संमतीविना अथवा पाठाबळाशिवाय झंवर यास इतरही ठिकाणचे सर्व प्रकारचे ठेके नक्कीच मिळाले नसतील व अशा ठेक्यात झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशाही एरव्हीच थांबल्या नसाव्यात, असे उघडपणे बोलले जात आहे. त्यामुळे सुनिल झंवर यास अधिकच बळ मिळाले अन् त्याने घोटाळ्यात आरोपी असलेल्या चमूला हाताशी धरून संघटितपणे बीएचआर घोटाळा जन्माला घातला असावा असेही बोलले जात आहे.चोरी करणार्या इतकाच त्यास सहकार्य करणारेदेखील तितकेच दोषी मानले जातात, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाल्यास नवल वाटू नये.