सीएनजी – पीएनजीच्या दरात वाढ, आजपासून नवीन दर लागू

0
38
सीएनजी - पीएनजीच्या दरात वाढ, आजपासून नवीन दर लागू

मुंबई, वृत्तसंस्था । नैसर्गिक वायूच्या (नॅचरल गॅस) किमतीत केंद्र सरकारने 62 टक्के वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडनेही पीएनजी आणि सीएनजीच्या दरांत अनुक्रमे प्रतिएकक व प्रति किलो दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मुंबईत सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 51.98 रुपये इतका आहे. यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. तर पीएनजीचा दर प्रति घनमीटर 49.40 रुपये इतका आहे.

केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमतीत केलेल्या वाढीमुळे वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि प्रमुख शहरांमध्ये घरगुती वापरासाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या पाईप गॅसच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याचाच भाग म्हणून महानगरकडूनह पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली. मुंबईतील अनेक वाहने सीएनजीवर चालतात. त्यामुळे वाहतुकीच्या भाडेदरात वाढ होऊ शकते. तसेच पीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे सामान्यांचे किचन बजेट कोलमडू शकते.

काही दिवसांपूर्वी दिल्लीसह उत्तर भारतात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. दिल्लीत शनिवारपासून सीएनजीच्या दरात 2.28 रुपये, तर नोएडा, गाझियाबाद आणि ग्रेटर नोएडात सीएनजीचा दर किलोमागे 2.55 रुपयांनी वाढला. तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजी गॅसच्या दरातही 2.10 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती.

यापूर्वी जुलै महिन्यात मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 2.58 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 55 पैशांची वाढ केली होती. गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले होते.

देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले. पूर्वीचा अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर सध्या 1.79 डॉलर्स इतका होता. 1 ऑक्टोबरपासून हे दर वाढवण्यात आले होते. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमतही ऑक्टोबरपासून वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व प्रकारच्या गॅसच्या किंमती 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत सर्वाधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक CNG इंधनाचा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात. यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. सीएनजीच्या वाढलेल्या दरांवरुन नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here