मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपुडा रविवारी पार पडला. या सोहळ्याला राजकीय नेत्यांची मांदियाळी जमली होती.
या आनंद सोहळ्यात विरोधी पक्षनेते, मादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांनी गळाभेट घेतली. त्यामुळे एरवी राजकीय मैदानात एकमेकांवर टिकेची तोफ डागमारे दोन नेत्यांनी गलाभेट घेतल्यानंतर हा चर्चेचा विषय बनला. मात्र, यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली व म्हणाले, “शत्रूही एकमेकांची गळाभेट घेतात, दोन मित्र भेटल्यानंतर मिठी मारतात” “आपल्या देशाची संस्कृती आहे, दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी, एरवी आपण एकमेकांना प्रेम देतो. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायलाच हवं होतं” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पवार साहेब भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणार –
तसेच, चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतही महत्त्वाचे आदरयुक्त विधान केले आहे. “राजकीय विषय वेगळे असले तरी स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यावर आपण एकमेकांची गळाभेट घेतो. राजकारणात मैत्री असायलाच हवी, जरी आम्ही पवार साहेबांवर टीका टिपण्णी केली, तरी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर त्यांच्यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही. पवार साहेब भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ही आमची संस्कृती आहे” असंही चंद्रकांतदादा म्हणाले.
दरम्यान, काल राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची भुमिका निभावणारे अशी ओळख असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या घरी आनंद सोहळा साजरा झाला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. या सोहळ्यात विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी गेल्या वर्षभरात न दिसलेलं चित्र आज पाहायला मिळालं.