चोपडा ः प्रतिनिधी
पुनर्विवाह व्हावे, अशी सर्वांची इच्छा असते परंतु पुढाकार कोणी घेत नाही. आजची सामाजिक परिस्थिती बिकट झाली असली किंवा मुलीचे प्रमाण कमी असले तरी चांगल्या वधुसाठी चांगला वर मिळणे कठीण झाले आहे. तर चांगल्या
वरासाठी उत्तम वधू मिळणे फारच कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जो तडजोड करेल त्याचेच विवाह जुळतील, असे अलिखित नियम होऊन गेला आहे. असाच एक आदर्श विवाह चोपडा शहरात पाहायला मिळाला.
तालुक्यातील विरवाडा येथील व चोपडा शहरातील लव्हली ट्रेलरचे संचालक स्व.सचिन हरकचंद सुराणा यांचे जवळपास ३ वर्षा पूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांची धर्मपत्नी घोडगाव येथील माहेर असलेली रिना ही कमी वयातच विधवा झाली होती.तिचे पुढील संपुर्ण आयुष्य कसे निघणार? या विवंचनेत सासर व माहेरची मंडळी होती. रिनाच्या सासुबाई श्रीमती लिलाबाई सुराणा याही अगदी कमी वयातच विधवा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी जीवन जगताना पतीविना पत्नीला काय यातना भोगावे लागतात हे लिलाबाईने जवळून पाहिले होते. त्यामुळे चांगला मुलगा मिळाला तर मी माझ्या सुनेचे लग्न लावून देईल, असे त्या नेहमी सांगत होत्या. त्यांच्या मनातील इच्छा त्यांनी त्यांचे जेठ ताराचंद सुराणा, मोठा मुलगा संदीप सुराणा, भाऊ जवरीलाल कटारिया यांना सांगितली. त्यानुसार त्यांनी वर शोधण्याचे काम सुरु केले. धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील स्व.लखीचंद नेमीचंद छाजेड यांचा मुलगा पुनमचंद छाजेड याला पसंद केले. त्या मुलाला देखील मुलगी पसंद आली आणि श्री स्वामीं समर्थ पॅलेसमध्ये आदेश बरडीया यांनी जैन पध्दतीने हे लग्न लावले. सासुनेच मुलगी समजून सुनेचे पुनर्विवाह करून दिल्याने उपस्थित मंडळी विशेष कौतुक करत होते. यावेळी आशिर्वाद देण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, संचालक नेमीचंद कोचर, संघपती गुलाबचंद देसरडा, वधुचे मोठे वडील अशोक सांडेचा, दिलीप सांडेचा, लतीष जैन, घोडगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील तर वरपक्षाकडून पारसमल छाजेड, अशोकचंद छाजेड, हे उपस्थित होते. लग्न जमविण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश छाजेड, सतिश छाजेड, सुनिल छाजेड, तर वधूपक्षा कडून नेमीचंद सांडेचा, जवरीलाल कटारिया, राजेंद्र सुराणा, संदीप सुराणा यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.ए.पाठक यांनी केले. याप्रसंगी पत्रकार मिलींद सोनवणे, संदिप ओली यांचीही उपस्थिती होती.