सातारा, वृत्तसंस्था । जिल्ह्यातील माण तालुक्यातील संभूखेड गावाचे सुपूत्र जवान सचिन विश्वनाथ काटे यांनी देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहूती दिली आहे. सचिन काटे यांचे वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी राजस्थानमध्ये देशसेवा करताना वीरमरण आले . सचिन यांच्या जाण्याने संपूर्ण काटे कुटुंब आणि संभूखेडावर गावावर शोककळा पसरली आहे.
२० ऑक्टोबर रोजी शहीद सचिन यांना वीरमरण आल्याची माहिती त्यांचे भाऊ रेवन काटे यांच्या राजस्थान लष्कराच्या युनिटने दिली. २३ ऑक्टोबर रोजी सचिन यांचे पार्थिव संभूखेड गावात आणले जाणार असून त्यांच्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सचिन यांच्या गावी त्यांच्या लग्नाची गडबड सुरू होती मात्र त्यांचे लग्न करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. सचिन यांच्या पश्चात त्यांचे आई वडिल आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे.
शहीद सचिन काटे हे २० ऑक्टोबर रोजी रात्री १० ते मध्यरात्रीपर्यंत राजस्थानमधील बाडमेर येथील जासई मिलिटरी कॅन्टेन्मेंट येथे ड्युटी करत होते. पहाटे चार वाजता त्यांना पुन्हा ड्युटीवर हजर रहायचे होते मात्र ते हजर न राहिल्याने त्यांचा शोध घेतला असता एका झाडाला सचिन यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर सचिन यांच्या सहकारी जवानांनी तात्काळ याची माहिती लष्कराला दिली. डॉक्टरांनी सचिन यांची तपासणी करताच त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय लष्कराने देखील या संबंधी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
सचिन काटे यांनी साताऱ्याच्या दहिवडी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. सचिन हे अत्यंत चपळ आणि उर्जावान तरुण होते. त्याचप्रमाणे ते उत्तम फुटबॉल, कबड्डी तसेच क्रिकेटपटू देखील होते. शहीद सचिन काटे हे २०१६मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. त्यांचा लहान भाऊ देखील सैन्यात असून देशसेवा बजावत आहे. पाच वर्ष त्यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी खर्च केले. या वर्षी गावी येऊन लग्न करण्याचे त्यांनी ठरवले होते. गावी त्यांच्या लग्नाची तयारी देखील सुरू होती मात्र त्यांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.