जळगाव ः प्रतिनिधी
राज्यभरातील महाबीज’च्या अधिकारी, कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ‘ड’ वर्गातील कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे आदी मागण्यांसाठी आज राज्यभरातील महाबीज’च्या अधिकारी, कर्मचार्यांनी महाबीज बहूजन कर्मचारी अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी संपास सूरवात केली आहे. जळगाव जिल्हा कार्यालय, विभागीय कार्यालय व एंरडोल येथील बीज प्रक्रिया केंद्रातील अधिकारी कर्मचार्यांनी संपात सहभाग नोंदविला आहे.
‘महाबीज’ मध्ये ६७१ पदे असून प्रत्यक्षात ४८२ कर्मचारी कार्यरत आहे. कोवीड संसर्गाची महामारी असताना शेतकर्यांचे हित लक्षात घेवून कर्मचार्यांनी जीव धोक्यात घालून शंभर टक्के सेवा दिली आहे. खरिप हंगामात शेतकर्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध करून दिले आहे. याची दखल घेत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला सातवा वेतन आयोग अधिकारी, कर्मचार्यांना लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ड वर्गातील कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, कनिष्ठ प्रक्रिया सहायक, आपरेटर यांना बारा वर्षाच्या सेवेनंतर दिलेल्या वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी आदी मागण्यासाठी कर्मचार्यांनी आजपासून राज्यव्यापरी संप पुकारला आहे. महाबीज व्यवस्थापने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. आंदोलनात एस.पी.फिरके, दीपक पाटील, हिरालाल पाटील, योगेश भागेश्वर, एस.जी.तायडे आदींनी सहभाग घेतला.