भुसावळ : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या साकेगाव येथे गेल्या महिन्यापासून कोरोना आजाराने थैमान घातले असून दररोज मृत्यूच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत गावात कडक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आता गावकरी करतांना दिसत आहेत.
तालुक्यातील साकेगाव सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र तयार झाल्याचे समोर येत असून गावात गल्लोगल्ली कोरोना आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत असल्याचे सांगितले जात आहे . गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे पदाधिकारी गावातील ग्रामस्थांना आवाहन करीत आहेत मात्र अनेक ग्रामस्थ या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे एवढेच काय तर अजूनही काही ग्रामस्थ काळजी घेत नसून आपापल्या कामानिमित्त भटकंती करताना दिसत आहेत. ग्रामपंचायतीने विनाकारण फिरण्यास बंदी घातली आहे तरीही काही टारगट आदेशाचे पालन करीत नसल्याने कोरोनाचा कहर दररोज वाढत आहे .
येथील कोरोनाचे अनेक रुग्ण डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत . गावात आरोग्य खात्याने कोरोना आजाराची तपासणी करण्यासाठी कॅम्प सुरू केला आहे , दररोज आरोग्य तपासणी केली जात आहे . मात्र प्रशासनाने गावात कोरोनाच्या या परिस्थीती कडे दुर्लक्ष करत नियम मोडणार्यावर पोलिसांची कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून गावातील ग्रामस्थांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावातूनच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.