जळगाव ः प्रतिनिधी
शहरात मध्यरात्री मवाली,गुंड प्रवृत्तीचे भुरटे चोर रस्त्यावर धावणार्या ट्रक चालकाशी जबरदस्ती कुरापत काढून मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून ट्रक चालकांना लुबाडले जाण्याचे प्रमाण वाढले आहे.त्याबाबत जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनने जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी काल पीडित वाहनचालक यांना कार्यालयात बोलावून प्रत्यक्ष हकीकत जाणून घेतली व योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
एखाद्या निवेदनावर उच्च दर्जाच्या पोलीस अधिकार्यांनी अशी बैठक आपल्या कार्यालयात घेतली याबाबत असोसिएशनच्या पदाधिकार्यांसह ट्रकचालकांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान वाहनचालकांनी त्यांच्यासोबत झालेल्या लूटमारांविषयी सविस्तर माहितीही दिली.
गेल्या काही दिवसांत जळगाव शहराच्या हद्दीत वाहनचालकांकडून लुटल्याच्या घटना समोर येत आहेत.पोलिस प्रशासन आपल्या पाठीशी आहे.
अशा घटनांचे आरोपी लवकर पकडले जातील यासंदर्भात श्री.चिंथा ट्रकचालकांना आश्वस्त केले.चांद खान (खंडवाचा चालक), चांद कुरेशी (जळगाव), पीडित मालक शरद चव्हाण असे पीडित वाहचालक आहेत.यावेळी जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद शाहिद, वसीम अहमद, रिझवान शेख आदी उपस्थित होते.