मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा ‘संसदरत्न’ पुरस्कार पटकावला आहे. सलग सातव्या वर्षीही सुळे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन (prime-point-foundation) आणि ई- मॅगॅझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
मागील १२ वर्षांपासून संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत ७५ खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या २६ मार्च रोजी दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती फाउंडेशन के. श्रीनिवासन यांनी दिली.
गेल्या सात वर्षांपासून सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. आतापर्यंत त्यांनी ४०२ प्रश्न उपस्थित केले, इतकेच नाही, तर आठ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळेंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.