मुंबई, वृत्तसंस्था । कच्च्या तेलाच्या महागाईची झळ सोसत इंधनदरवाढ रोखून धरणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आता पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल २२ दिवसांनी महागले असून, डिझेलचा दर सलग चौथ्या दिवशी वधारला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी केवळ डिझेल दरात वाढ केली होती. मात्र, आज (मंगळवार) पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत.
गेल्या २२ दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलबरोबरच पेट्रोलच्या दरातही वाढ केली. देशभरात पेट्रोलचा दर २० ते २२ पैशांनी वधारला आहे. तसेच डिझेलच्या दरात गेले सलग चार दिवस वाढ करण्यात येत असून, आज डिझेल २५ पैशांनी महागले आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी ०१ आणि ०५ सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या दरात अनुक्रमे १५ पैशांची कपात केली होती. त्यानंतर पेट्रोलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, त्यानंतर पेट्रोल २० ते २२ पैशांनी महाग झाले आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.४७ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.४७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.१५ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८७ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.८५ रुपयांवर गेला आहे.
गेल्या सलग तीन दिवसांपासून डिझेलचा दर वाढवण्यात आला आहे. आज डिझेल पुन्हा २५ पैशांनी वधारले. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९७.२१ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.५७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९४.१७ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.६७ रुपये प्रती लीटर इतका आहे. तर, भोपाळमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक असून, तो ९८.४५ रुपये प्रती लीटर झाला आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर असून, देशात भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत.