पहूर, ता.जामनेर : वार्ताहर
जामनेर तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेल्यैा पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचेच वर्चस्व सिध्द झाले असून ग्रामपंचायत सरपंचपदी आशाबाई शंकर जाधव यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदासाठी राजू रामदास जाधव (राजू भैय्या) यांची वर्णी लागली आहे.
काल रोजी दुपारी १२ वाजेपासून ग्रामपंचायत सभागृहात सरपंच उपसरपंच निवडीची कार्यक्रम घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी काम पाहिले.
माजी पंचायत समिती सभापती बाबुरावआण्णा घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३० वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये सत्ता असून या पंचवार्षिक निवडणुकीतही त्यांनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. यावेळी सुध्दा ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाचे १७ पैकी ९ उमेदवार विजयी झाले होते. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलला ६ जागांवर समाधान मानवे लागले होते तर राजू जाधव आणि विक्रम घोंगडे हे दोन अपक्ष उमेदवार निवडून आले होते.
पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सर्वसाधारण गटाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यानुसार आज सरपंच, उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या आशाबाई शंकर जाधव यांनी सरपंचपदासाठी तर उपसरपंच पदासाठी राजू रामदास जाधव यांनी अर्ज दाखल केला. भाजपाकडून आशा शंकर जाधव व सुनीता लक्ष्मण गोरे यांनी अर्ज दाखल केला तर महाविकास आघाडीकडून कल्पना दिनकर पवार यांनी अर्ज दाखल केला होता. सुनिता गोरे व कल्पना पवार यांनी माघार घेतल्याने आशा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदासाठी भाजपा प्रणीत राजू जाधव यांना ९ तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार अशोक लक्ष्मण जाधव यांना ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंचपदी आशा जाधव व उपसरपंचपदी राजू जाधव यांची निवड झाल्याचे जाहीर केले. सरपंच पदासाठी गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष वासुदेव घोंगडे, माजी सरपंच लक्ष्मण गोरे यांच्या पत्नी सुनिता गोरे, माजी उपसरपंच योगेश भडांगे यांचीही नावे चर्चेत होती. अखेर विरोधी सदस्यांनीही पाठिंबा दिल्यामुळे आशाबाई शंकर जाधव ह्या बिनविरोध निवडून आल्या.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, प्रशासक रामचंद्र वानखेडे, लक्ष्मण गोरे, अरविंद देशमुख, समाधान पाटील, ललीत लोढा, रामेश्वर पाटील, शंकर जाधव, युवराज जाधव, मधुकर पवार, दिनकर पवार, विवेक जाधव, शाम सावळे, अर्जुन लहासे, रामदास जाधव, दत्तू जाधव, राहूल ढेंगाळे, माधव घोंगडे, विनोद थोरात, शिवाजी राऊत, मधुकर बनकर, चेतन रोकडे यांच्यासह ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ ग्रामपंचायत परिसरात उपस्थित होते.