सरकार गेले तरी त्यांचा अहंमपणा सुटलेला नाही ः खडसे

0
7

जळगाव ः प्रतिनिधी

राज्याचे राजकारण बदलतेय. महाविकास आघाडी पाय रोवतेय. हे सरकार टिकणार, चालणार आहे. कार्यकर्ते पक्षात टिकवून ठेवण्यासाठी विरोधी पक्ष सरकार पडणार असल्याच्या वावड्या उठवतोय. त्यांच्या अहंपणामुळे सरकार पडले.अद्यापही त्यांचा तो अहंमपणा सुटलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

 

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संवाद यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यानिमित्त आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा बैठकीत श्री.खडसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी होते. जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, गफ्फारभाई मलिक, माजी आमदार अरुण पाटील, मनीष जैन, कल्पनाताई पाटील, अभिषेक पाटील, मंगला पाटील, कल्पिता पाटील, विलास पाटील आदी उपस्थित होते.

दिवंगत माजी आमदार हरिभाऊ महाजन व राष्ट्रवादी परिवारातील सदस्यांच्या नातेवाइकांच्या मृत्यूबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच माजी आमदार मनीष जैन यांचा वाढदिवसही या बैठकीत साजरा करण्यात आला.

या वेळी बोलतांना खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यास अनेक मोठे लोक इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचा अनेक वर्षांत ग्रामीण भागापर्यंत विस्तार झाला आहे  मात्र, बर्‍याचशा क्षेत्रात कार्यकर्ते पोहोचलेले नाहीत.ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. बोदवड, मुक्ताईनगर मतदारसंघातील विरोधकांनी केवळ पाच ग्रामपंचायतींची नावे द्यावीत,असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच आगामी नगरपालिका, सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करा, असेही सांगितले.

‘जे आमच्यावर सध्या टीका करतात, त्यांची गावातून निवडून येण्याची क्षमता नाही. राजकारणात चांगल्या, वाईट गोष्टी घडतच असतात’, असे खडसे म्हणाले. त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जळगाव दौरा यशस्वी करण्याचेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. गुजराथी यांनी प्रदेशाध्यक्षांच्या जळगाव जिल्हा दौरा कायम लक्षात राहावा, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. त्याचबरोबर चालू वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असून, त्यावर नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन गुजराथी यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here