
जळगाव ः प्रतिनिधी
लेवा पाटीदार समाजातील युवा पिढीला शिक्षण, प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्योग, समाजकारण आदी विषयांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने लेवा यूथ फोरमची स्थापन करण्यात आली. ऑनलाइन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात या फोरमचे उद्घाटन झाले. त्यात नाशिक येथील सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे यांनी समाजातील तरुणांनी स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:चा ठसा उमटवला पाहीजे, असे प्रतिपादन केले.
डोंबिवली येथील हर्षल भंगाळे, प्रा.डॉ.राम नेमा, निशा अत्तरदे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला मंडळाच्या सचिव स्नेहल अत्तरदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर मानसी चौधरीने गणेश वंदना सादर केली. प्रास्ताविकात फोरमचे अध्यक्ष हर्षल भंगाळे यांनी लेवा समाज अधिक सशक्त व्हावा, हेच फोरमचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. यानंतर फोरमच्या लोगोचे अनावरण झाले. हर्षल भंगाळे यांनी लेवा यूथ फोरमची कार्यकारिणी जाहीर केली. त्यात हर्षल भंगाळे (अध्यक्ष), हर्षल कोळंबे (उपाध्यक्ष), स्नेहल अत्तरदे (सचिव), भाविका पाटील (सहसचिव), नितीन ढाके (खजिनदार), भावेश भोळे (सहखजिनदार), सदस्यांमध्ये किरण राणे, राजस चौधरी, नेहा पाटील, मिलिंद पाटील, डॉ.प्रा.राम नेमाडे, निशा अत्तरदे, आकाश धांडे, संजय नेमाडे, मनीषा कोल्हे यांचा समावेश आहे.
या सोहळ्यात सहभागी ठाण्याचे अपर जिल्हाधिकारी श्यामसुंदर पाटील यांनी, युवकांना रोजगार सुरू करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल? ही माहिती देताना एखादी छोटी माहिती एखाद्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकते, असे सांगितले. प्रमुख पाहुणे नाशिक येथील डॉ. प्रमोद महाजन यांनी, हे फोरम केवळ माहितीची देवाणघेवाण करणारे माध्यम न ठरता शिक्षण, प्रशिक्षण आणि युवकांमध्ये परिवर्तनाचे साधन ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सोबतच माहितीपेक्षा ज्ञान महत्त्वाचे आहे. विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे सांगितले.
नाशिक इंदिरा नगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निखिल बोंडे यांनी, समाजातील युवकांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे, असा सल्ला दिला. लेवा पाटीदार कम्युनिटी फेसबुक समूहाचे नरेंद्र महाजन यांनी, समाजकार्य करताना सोशल मीडियाचे महत्व पटवून दिले. पुणे येथील एलसीसीआयचे (लेवा चेंबर) संस्थापक पवन भोळे यांनी, व्यवसाय करण्यासाठी वयाचे बंधन नसते. लेवा चेंबरने बनवलेल्या व्यासपीठाचा समाजाने वापर करावा, असे सांगितले. लेवा शुभमंगल ऍपचे निर्माते हर्षल जावळे (भालोद) यांनी सामाजिक कार्यात इगो बाजूला ठेवून काम करावे, या मुद्द्यावर जोर दिला. स्नेहल अत्तरदे यांनी आभार मानले.


